प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.सध्या इंटरनेटसह वेगवेगळ्या साईटसवर माहिती व मनोरंजनाचा खजाना आहे. एका क्लिकवर पाहिजे ती माहिती उपलब्ध होते, कधीकाळी सिनेमा हाऊसफुल्ल असायचे, तर बैठक रुमची शान असलेल्या चांगल्या वाईट काळात आवडीचे संगीत ऐकवणारी यंत्रणा म्हणजे रेडिओ, टेपरेकार्डर, सीडी, डिव्हीडी, होम थिएटरदेखील मृत्यू शय्येवर पडल्यागत झाले आहे. त्यांची जागा टीव्ही व मोबाईलने घेतली आहे.पण त्याच्या आधीच्या काळी फक्त रेडिओ हेच तेवढे मनोरंजनाचे साधन होते. काही ठरावीक घरात रेडिओ असायचा. तमाशे, नाटक हेदेखील आकर्षक होते. पण त्याकाळी भराडी मंडळी ज्यांना काही भागात नाथजोगी म्हटले जाते. ते आपल्या या टिंगरी वाद्याने जनतेचे मनोरंजन करीत असत. दोन पोकळ लाकडी पाईपाला विशिष्ट तारा बांधून दुसऱ्या लाकडी पाईपच्या तारेने आवडीचे सुर काढून घुंगरुंच्या तालावर वेगवेगळ्या लकबीत वाजवून त्यावर पोवाडे गीत बसवले जाते. हे पोवाडे ग्रामीण जनतेचे आकर्षण होते. धार्मिक, देशभक्ती तसेच समाजातील एखाद्या गाजलेल्या घटनेवर सुंदर वर्णनासह पोवाडे ऐकवले जायचे. या मनोरंजनातून मिळणाºया पैशातून या नाथजोगी कुटुंबाचा संसारगाडा चालत होता. टिंगरीवाला गावखेड्यात आला की, एखाद्या निंबाच्या झाडाखाली किंंवा आंब्याच्या झाडाच्या सावलीत मैफील सजायची. मोठी गर्दी जमा व्हायची. आवडीचा पोवाडा म्हणण्याची फर्माईश व्हायची. त्यावर खूश होऊन जो तो आपापल्या परीने बक्षिसे देत होते. परंतु हल्लीच्या धावपळीच्या व भयंकर सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या जगात या कलेची गरज व आवड संपल्याने ही कला काळाच्या ओघात नष्ट पावत चालली आहे. या कलाकारांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न त्यांच्या उतरत्या वयात निर्माण झाला आहे. कारण ही कला जोपासणारी ही शेवटची पिढी हल्ली शिल्लक आहे. नवे पोरं याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हा भारतीय वारसा पुढेदेखील सुरू रहावा, ही कला लुप्त होऊ नये, यासाठी प्रयत्न होणे अथवा या नाथजोगी समाजातील कलाकारांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.हे टिंगरी वाद्य कधीकाळी एवढे लोकप्रिय होते की, ग.दि.माडगूळकरांच्या कथेवर आधारित डाकूंमध्ये मानसिक सुधारणा घडवून आणणारा १९६०च्या दशकातील 'दो आँखे बारा हाथ' ह्या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या हातात संपूर्ण चित्रपटात हेच वाद्य दाखवण्यात आले आहे. याच वाद्यावर आधारित अत्यंत गाजलेले गाणे ‘सैंया झुठोंका बडा सरताज निकला’ हेदेखील चित्रीत करण्यात आलेले होते. त्यानंतर या वाद्याचा उपयोग अनेक चित्रपटात झालेला होता. यावरून या वाद्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावा.वयाच्या सातव्या वर्षापासून टिंगरी वाजवतो आहे. त्याकाळी अत्यंत गरिबी होती. खायला मिळत नव्हते. टिंगरी वाजवून पोवाडा म्हटल्यावर भाकरी मिळायची. कुणी पैसे दोन पैसे द्यायचे तर कुणी पाच, दहा पैसे द्यायचे. उपजीविका छान व्हायची. अख्खा महाराष्ट्रात फिरलो आहे. २५ ते ३० पोवाडे तोंडपाठ असतात. त्यात राजा कोळी सायगव्हाण, नाल्या मांग निजामपूर, गुलब्या नाईक मालेगाव, गणेश वकील डोकलखेडे या त्याकाळी गाजलेल्या घटनांवरचे हे पोवाडे लोक अत्यंत तन्मयतेने ऐकत असत. आमची कला हल्ली कोणी ऐकत नाही. उपजीविकेचे साधन नष्ट होत आहे. सरकारने आम्ही हल्ली जे संबंध महाराष्ट्रात मिळून १५ ते २० कलाकार शिल्लक आहोत, आमच्या उतारवयाच्या उपजीविकेसाठी आर्थिक मदत करावी. आम्हाला पेंशन अथवा मानधन सुरू करावे, अशी मागणी नाथजोगी समाजाचे महिंदळ्याचे ७० वर्षीय शंकर सायबू भराडी यांनी यानिमित्ताने केली आहे.
टिंगरी वाद्य मोजतेय अखेरच्या घटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 4:30 PM
एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
ठळक मुद्देमनोरंजनाची कला टिंगरी वाद्य पडद्याआड जाणार कला व कलाकार जिवंत राहण्यासाठी मानधन मिळण्याची अपेक्षा