जळगाव : जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी क्रीडा संघटना आक्रमक झाल्या असून, समस्या सोडविण्यासाठी क्रीडा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली जाणार आहे. त्यांना यश आले नाही तर पालकमंत्र्यांच्या माध्यामातून मार्ग काढायचा, असा निर्णय क्रीडा संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा संघटना प्रतिनिधींची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी पार पडली. यावेळी विविध संघटनांचे १९ पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत शालेय स्पर्धांना संघटनांनी तांत्रिक सहाय्य करावे, परंतु तक्रार राखून ठेवावी. आपल्यामुळे खेळाडूंचे नुकसान होता कामा नये अशी भूमिका मांडण्यात आली. क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल व क्रीडा धोरण याबाबत सर्व तक्रारी एकत्रित करून ज्या जिल्हा पातळीवर सोडविण्यासारख्या आहेत, त्या जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोडवू आणि त्यांना यश आले नाही तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मार्ग काढूया, असे ठरविण्यात आले.
सभेत शाम कोगटा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवलकर, क्रीडा संघटक फारूक शेख, राजेश जाधव, अनिता पाटील, नितीन बर्डे, दिलीप गवळी, योगेश जाधव, रंजीत पाटील, दिलीप घुले, निलेश बाविस्कर, योगेश सोनवणे, नरेंद्र भोई, रवींद्र धर्माधिकारी, जितेंद्र शिंदे, विवेक अळवणी व अनिल माकडे आदी उपस्थित होते.
संघटनांना आवाहन
क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संकुलाबाबत समस्या, तक्रारी असतील त्या सोमवारी सायंकाळपर्यंत लेखी स्वरूपात प्रदीप तळवलकर, नितीन बर्डे, राजेश जाधव, फारुक शेख यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन संघटनांना करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार...
क्रीडा धोरणाबाबत राज्य सरकारकडे असलेल्या तक्रारींचे निवारण होण्यासाठी लवकरच आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेटून अडचणी सोडविण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा अधिकारी यांना बुधवारी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले.