कुंदन पाटील
जळगाव : दुर्गम तसेच अतिदुर्गम भागासह जिल्ह्यात उघड्यावर अंत्यसंस्कार होत असल्याने मृतदेहाची हेळसांड होत आहे. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील स्मशानभूमीची सातबाऱ्यावर नोंद घेण्याचे आणि प्रत्येक गावात स्मशानभूमी उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तसे आदेश काढले आहेत.
प्रत्येक गावातील शासकीय जमिनीवर स्मशानभूमीसाठी भूखंड आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र अनेक ठिकाणच्या स्मशानभूमींची सातबाऱ्यावर नोंदी घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे कुठल्या गावात स्मशानभूमी नाही, याची माहिती तातडीने उपलब्ध होत नाही. परिणामी तिथल्या ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार आटोपावे लागतात. तसेच दुर्गम भागातील मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा प्रकारही अनेकदा उघड झाला आहे. ही बाब अतिशय वेदनादायी आहे. म्हणून गावातील शासकीय भूखंडावर स्मशानभूमी उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मुक्ताईनगर, अमळनेर मागे
जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्मशानभूमींची संख्या पुरेसी आहे. मात्र मुक्ताईनगर, अमळनेर व पारोळा तालुक्यात सर्वात कमी स्मशानभूमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. ८१ गावे असताना मुक्ताईनगरमध्ये ६३, १५४ गावे असताना अमळनेरमध्ये १३९ तर ११४ गावे असताना पारोळा तालुक्यात केवळ १०१ स्मशानभूमी आहेत.
तालुकानिहाय स्मशानभूमी असलेली गावे
तालुका-गावे-स्मशानभूमी
जळगाव-९२-७०जामनेर-१५५-१५०धरणगाव-८९-८२एरंडोल-६५-६१भुसावळ-५४-४१यावल-८४-८३रावेर-११७-११५मुक्ताईनगर-८१-६३बोदवड-५२-४९पाचोरा-१२९-१२३चाळीसगाव-१३७-१३२भडगाव-६३-६०अमळनेर-१५४-१३९पारोळा-११४-१०१चोपडा-११६-११६