जळगाव : वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या बळावर ‘लोकमत’चा ४३ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने वाचक व हितचिंतकांच्या स्वागतासाठी ‘लोकमत भवन’मध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळेत स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कोरोनाचे सावट असल्याने सर्व नियमांचे पालन करीत यंदा संध्याकाळऐवजी दुपारीच ‘लोकमत’च्या एमआयडीसी कार्यालयात हा स्नेहसोहळा होणार आहे. यंदा कोरोनाचे सावट असले तरी वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या भेटीची ओढ असल्याने कोविड-१९चे सर्व शासकीय नियम पाळून वाचक, हितचिंतक व स्नेहीजनांनी सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हावे, कृपया पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणू नये, असे आवाहन ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी केले आहे.
खान्देशशी ‘लोकमत’ची नाळ जुळून चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. समाजजीवनात स्थित्यंतरे घडली. खान्देशी माणसाच्या मनातला ओलावा आणि ‘लोकमत’मधील खान्देशविषयीची आस्था, स्नेह वृद्धिंगत होत राहिला. ही सुखद आणि आश्वासक वाटचाल केवळ आपल्यासारख्या सुहृदांच्या स्नेह व पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे.
वर्धापन दिनानिमित्त विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेले बदल, प्रगती, तंत्रज्ञानामुळे झालेले परिवर्तन तसेच कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांनी कशी भरारी घेतली, याची प्रातिनिधिक स्वरुपात माहिती देण्यात आली आहे.