लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा न घेता ऐतिहासिक निकाल लावण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नुकताच बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीने हा निकाल लावण्यात आला. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही आक्षेप आहे किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवार, ११ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ११ ते १८ ऑगस्ट अशी आहे. या तारखांदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर १९ ते २५ ऑगस्ट दरम्यानही विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना ‘विलंब शुल्क’ द्यावं लागणार आहे.
यांना देता येणार परीक्षा...
राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला. मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांनाही ही परीक्षा देता येणार आहे.
दोन संधी मिळणार
श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२१ मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची संधी या परीक्षेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, नव्याने आवेदन भरणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे सन २०२१ च्या नियमित विद्यार्थ्यांना सन २०२१ मधील पुरवणी परीक्षा व सन २०२२ मधील मुख्य परीक्षा अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.
००००००००
दहावीचा निकाल : ९९.९४ टक्के
०००००००
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : ५८,२४९
दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : ३०
=======
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी : ४५,१५०
बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : २०७
०००००००
बारावीचा निकाल : ९९.५४ टक्के