लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर बुधवारी नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच महासभा होणार आहे. महासभेपुढे मंजुरीसाठी एकूण ७७ विषय ठेवण्यात आले आहेत. महासभेत विषय पत्रिकेवरील विषयांव्यतिरिक्त महापालिकेत झालेल्या ऐतिहासिक सत्तांतराचा प्रभावदेखील राहणार असून, भाजपातील फुटीवरून देखील महासभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही महासभा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मुख्य महासभेच्या आधी महापालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरीसाठी विशेष महासभेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही महासभा आटोपल्यानंतर मुख्य महासभेला सुरुवात होणार आहे. महापालिकेवरील हुडकोच्या कर्जापोटी राज्य शासनाने २५३ कोटींची एकरकमी रक्कम हुडकोला अदा केली होती. त्यातील निम्मी रक्कम मनपाला राज्य शासनाला प्रत्येक महिन्यात ३ कोटी रुपयांप्रमाणे १२५ कोटी अदा करायचे आहे. आतापर्यंत महापालिकेने ५३ कोटी रुपयांची आघाडी केली आहे. उर्वरित ७१ कोटी रुपयांची अदायकी राज्य शासनाने माफ करावी यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यासह शहराची दैनंदिन सफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनी व मनपा दरम्यान दुवा म्हणून काम करणाऱ्या लवादाच्या नियुक्तीचा प्रस्ताव देखील महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. या विषयावर देखील महासभेत कामकाज होणार आहे.
त्या ७० कोटींच्या रस्त्यांचा ठराव करण्यात येईल रद्द
तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या काळात शहरात मनपा फंडातील ७० कोटी रुपयांच्या निधीतून शहरात रस्त्यांची कामे करण्याबाबत ठराव करण्यात आला होता. मात्र नवीन सत्ताधाऱ्यांनी हा ठराव रद्द करून शहरातील रस्त्यांची कामे नगरोत्थान अंतर्गत शासनाने स्थगिती दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे सादर केला आहे. या विषयावर देखील महासभेत चर्चा होणार आहे. महासभेत एकूण ७७ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. यामध्ये मनपा प्रशासनाकडून १५ विषय आले आहेत तर उर्वरित ६२ विषय पदाधिकाऱ्यांकडून आलेले आहेत.
आयत्या वेळेच्या विषयांवरही होणार चर्चा
शहरातील मेहरुण तलाव परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्याबाबतचा ठराव देखील महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. तसेच घरकूल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव देखील महासभेपुढे सादर केला गेला आहे. तसेच दलित वस्ती सुधार अंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्ती व गटारीच्या कामाबाबतचा रस्तादेखील महासभेत ठेवण्यात आला आहे. यासह गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर उड्डाण पुलाचा टी व एल आकारावरून निर्माण झालेल्या वादावर देखील महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त शहरात वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत देखील महासभेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.