बालपणापासूनच खरं तर मला कवितांची खूप आवड होती. शाळेत कुठलीही मराठी हिंदी, इंग्रजी अगदी कुठलीही कविता शिकवली गेली की घरी येऊन तिला वेगवेगळ्या चालींवर म्हणून पहायचा जणू छंदच लागला होता मला. आणि मग सारखा विचार यायचा कविता तयार कशी होते? ते शब्द कसे सुचतात? ते यमक वगैरे तेव्हा कळत नव्हते. तरी तो ओळींचा समसमानपणा मनाला आवडायचा. मग मीही वेडेवाकडे प्रयत्न करून पहायचे पण नाही जमायचं.एक दिवस आजी गाणं गुणगुणत होती. मी विचारलं, तर ती म्हणाली, असंच आलं, म्हणाली, ‘आम्ही शेतात काम करता करता म्हनत त्याच्यानं कामाचा थकवा वाटेना आम्हाले.’ आजीला जात्यावरच्या ओव्याही छान येत होत्या.‘माही संगातीन चांगोनातिले सैपाक जमेना’अशा ओळी आजी म्हणून दाखवायची. मग मी नेहमी आजीजवळ बसून तिला ओव्या म्हणायला लावायचे.‘यक चिमनं पाखरूत्याचं इतुसं लेकरूदाना चोचमधी दबीसनपोट लेकराचं भरू’अशा काही ओव्या आजी ऐकवायची.मला अतिशय आवडायच्या त्या.मलाही वाटायचे की मी असंच लिहू शकेल का? आजी दोन चार ओळीच म्हणायची. त्याला अनुसरून मी आधी दोन ओळी लिहिल्या. त्याच गुणगुणत राहिले काही दिवस. आजीला ऐकवल्या आणि पहिलं बक्षीस चॉकलेटच्या स्वरूपात मिळालंआजी म्हटली, ‘गह्यरं मस्त गानं लिहिते वं माय माही नात’हे शब्द प्रेरणादायी ठरले.आजीच्या आनंदासाठी रोज तिला काही तरी ऐकवायला लागले.कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेताना हळूहळू कळू लागले कवितांचे प्रकार, त्यातले बारकावे.पुढे मी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. तरी कवितेशी नाळ मात्र घट्ट होती.करता करता एक डायरीत जवळपास ६०-७० कविता लिहिल्या. पण त्या फक्त डायरीतच होत्या. सासरी येताना मी ती डायरी सासरी घेऊन गेले आणि नकळत एक दिवस ती आमच्या अण्णांच्या हातात पडली आणि तिचं सोनं झालं. त्यांनी ती माझ्या नणंदबाई प्रा.संध्या महाजन यांच्याकडे पोहोचवली आणि त्यांनी पुस्तक रुपात मला अनोखी भेट दिली. अशाप्रकारे माझा पहिला काव्यसंग्रह ‘जीवन गाणे’ प्रकाशित झाला.‘जीवनगाणे’वरून मला प्रेरणा मिळाली आणि माझा दुसरा काव्यसंग्रह ‘मन... एक स्वच्छंदी पाखरु’ प्रकाशित झाला. काहीतरी वेगळं म्हणून मी त्याला वेगवेगळ्या चित्रकाव्याने सजविला. ग्राफिक्स आणि कॅलिग्राफीच्या साह्याने त्याला अधिक आकर्षक असे स्वरूप देऊन हा संग्रह काव्यरसिकांसाठी उपलब्ध करून दिला.-शरयू जीवन खाचणे
आजीचे शब्द ठरले प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:40 PM