बोदवड जि.जळगाव : स्वच्छ भारत अभियानात २७ मृत लोकांच्या नावाने प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी बोगस खाते उघडून उकळल्याचा प्रकार तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. केवळ मृतांच्या नाही तर गावातील ३८० लोकांच्या नावावर आलेल्या तब्बल ५० लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे.
फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२० या सात महिन्यांच्या कालावधीत शेलवड ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी गावातील पाच ते तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने स्वच्छ भारत अभियानात व्यक्तीगत शौचालयासाठी प्रत्येकी बारा हजार रुपयांप्रमाणे मिळणारा निधी काढून घेतला. यासाठी मृतांच्या नावाने बोगस खाते जामनेर येथे उघडण्यात आले.
या प्रकरणात ग्रामसेवक संदीप निकम यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ यांची नाशिक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने चौकशी झाली आहे, तसेच याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बोटे यांनी चौकशी केली; मात्र यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने तक्रारदार व शेलवडचे ग्रा.पं. सदस्य दीपक माळी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत तत्कालीन बीडीओ आर. ओ. वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
कोट
शेलवड ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोग अपहारप्रकरणी विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे. शेलवड ग्रामपंचायतीचे जेवढे दप्तर उपलब्ध झाले आहे, त्याप्रमाणे कारवाई केली आहे. - संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी, बोदवड.