लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटच्या प्रसाधनगृहात एका विक्रेत्याकडून पदार्थ तयार केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान अनेक स्वच्छतागृहे बंद असल्याचे आढळून आले. येत्या आठवडाभरात गोलाणी मार्केटमधील बंद असलेली सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ करून पुन्हा सुरू करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
यावेळी महापौरांसह उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक किशोर बावीस्कर, चेतन सनकत यांच्यासह महापालिका आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित होते. स्वच्छतागृहात पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशदेखील महापौरांनी दिले आहेत. यासह गोलाणी मार्केट व शहरातील इतर मार्केटमध्येदेखील अशा प्रकारची तपासणी करून बंद असलेले स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून घेतला आढावा
महापौर व उपमहापौर यांनी आपल्या दालनात आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापौरांनी शहरातील स्वच्छतागृह नेहमीच साफ करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. यासह पाणीपुरवठा विभागालादेखील या ठिकाणी नियमितपणे पाणी पुरवले जाईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
रुग्ण वाढल्यास कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणार
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली असल्याची माहिती महापौरांनी दिली. सद्य:स्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये पुरेसे असून, रुग्णांची संख्या वाढल्यास काही सेंटरदेखील सुरू करण्यात येतील अशीही माहिती महापौरांनी दिली. रुग्णांना बेड कमी पडू नयेत म्हणून इकरा कोविड केअर सेंटरमध्ये २०० बेड असून जळगाव महापालिका कोविड सेंटर हे रुग्णांसाठी नेहमी कार्यान्वित असेल तसेच रुग्णांसाठी पौष्टिक आहार दिला जातो तसाच आहार नेहमी दिला जाईल, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले.