तोंडापूर, जि. जळगाव: आठ महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेल्या शौचालयाची भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी येथून जवळच असलेल्या ढालसिंगी (ता. जामनेर) येथे घडली. या वेळी शौचालयात असलेल्या बहिणाबाई गोतमारे या वृद्धा बालंबाल बचावल्या. शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला जात आहे.ढालगाव ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ढालसिंगी येथील शालीक लक्ष्मण गोतमारे या लाभार्थ्याला आठ महिन्यांपूर्वी शासकीय योजनेतून शौचालय मिळाले. गावातील इतर शौचालयांप्रमाणेगोतमारे यांच्या शौचालयाचेही काम ठेकेदारामार्फत करण्यात आले. गुुरुवारी गोतमारे यांच्या आई बहिणाबाई गोतमारे या शौचालयात असताना अचानक शौचायलयाची भिंत कोसळली. सुदैवाने ही भिंत बाहेरच्या बाजूने कोसळल्याने बहिणाबाई गोतमारे या बालंबाल बचावल्या.ढालसिंगी येथे शंभरच्यावर लाभार्थ्यांकडून ग्रामपंचायतीने थोडे कमीशन काढून विनापरवाना ठेकेदारांना शौचायलयाचे बांधकाम दिले, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. शासनामार्फत येणाºया प्रत्येकी बारा हजार रुपयांच्या अनुदानातून गावात उभारण्यात आलेल्या सर्वच शौचायलयांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करीत या बांधकामाची चौकशी व्हावी, अशी मागणी शालीक गोतमारे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.स्वत: पंतप्रधान देशभरातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मोहीम राबवित आहे. मात्र अधिकारी व ठेकेदार या योजनेचा गैरफायदा घेऊन बोगस बांधकाम करीत शासनाची फसवणूक करीत असल्याचाही आरोप या निमित्ताने केला जात आहे.
आठ महिन्यांपूर्वीच बांधलेल्या शौचालयाची भिंत कोसळली, वृद्धा बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 9:15 PM