जळगाव : पैश्यांच्या वादातून शेख अनवर शेख इर्शाद (२७,रा. फातेमा नगर) या तरुणाच्या डोक्यात टॉमी टाकून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे बारा वाजता फातेमा नगरात घडली. शेख अनवर शेख इर्शाद हा ट्रकवर क्लिनरचे काम करतो. दोन महिन्यांपूर्वी त्याने शेख शाहीद शेख फारुख (२४,रा. सुप्रिम कॉलनी) याच्याकडून ३ हजार रुपये उसनवारीने घेतले होते. सोमवारी सकाळी शाहीद अनवरच्या घरी गेला आणि पैश्यांसाठी तगादा लावला. दुपारपर्यंत पैसे देतो असे सांगितले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पैशावरुन वाद झाला. यात अनवरने शाहीदच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने शेख शाहिद याने ट्रकमधील टॅमी डोक्यात हाणली. यात अनवरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.