जळगाव : शासनाने राज्यभरात व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. आठवडानिहाय असलेल्या या उपक्रमांतर्गत २३ व्या आठवड्यात भुसावळ तालुका जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. २३ व्या आठवड्यात जिल्ह्यातील ४६.९७ टक्के विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन २ लाख ९२ हजार १३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वाध्याय सोडविला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय गेल्या वर्षभरापासून बंद आहेत; पण शासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवले आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्वाध्याय हा उपक्रम संपूर्ण् राज्यास सुरू आहे. इयत्ता पहिली ते चौथीला गणित, विज्ञान, भाषा असे विषय आहेत. विद्यार्थ्यांना दहा-दहा प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. हा उपक्रम आठवडानिहाय असल्याने प्रत्येक आठवड्याला नवीन प्रश्न स्वाध्यायमध्ये समाविष्ठ करून ते व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातात. या स्वाध्याय उपक्रमाच्या २३ व्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातून २ लाख ९२ हजार १३० विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले आहे.
भुसावळातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
भुसावळ तालुक्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या ३६ हजार ४१५ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार १५६ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग नोंदविला. जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या तालुक्यांमध्ये भुसावळ तालुक्याने बाजी मारली आहे. त्या पाठोपाठ मुक्ताईनगर व तिसऱ्या क्रमांकावर एरंडोल तालुका आहे.
अशी आहे स्वाध्याय उपक्रमात सहभागी विद्यार्थी संख्या
तालुका उपक्रमात सहभागी विद्यार्थी
भुसावळ ३२१५६
मुक्ताईनगर १३४३८
एरंडोल १४५४५
पाचोरा २६०१४
भडगाव १३६३२
यावल १९३७२
जळगाव ग्रामीण १७८४१
अमळनेर १८६५७
रावेर २०६०९
चाळीसगाव २९७५७
धरणगाव ११३४४
बोदवड ५५७०
जामनेर २३९५४
चोपडा १७३७६
जळगाव शहर १८७००
पारोळा ९१६५