लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा सत्ताधाऱ्यांना शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. त्यातच काही नगरसेवकांचा थाट भलताच न्यारा आहे. सोमवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत असाच तोरा एका नगरसेविकेचा दिसून आला. सभेचा अजेंडा घरी पाठविला असताना, सभेत हजर न झाल्याने सभापतींनी विचारपूस केली असता, जर घरी गाडी पाठविली तरच सभेत येऊ, असा दम एका नगरसेविकेने भरला. त्यानंतर त्या नगरसेविकेला घरून घ्यायला मनपाची गाडी पाठविली गेली. त्यानंतरच सभा घेण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला.
शहरात डझनभर समस्या आहेत. मनपातील काही पदाधिकारी आजही मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मनपाची वाहने वापरत नाहीत. मात्र, दुसरीकडे नागरिकांसंबधी निर्णय होणाऱ्या सभांमध्ये ही जाण्यासाठी अनेक सदस्यांना मनपाची गाडी घरी पाठवावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुळात, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनाच मनपाकडून वाहन उपलब्ध करून दिले जाते. सदस्यांना हे वाहन उपलब्ध करून दिले जात नाही. मात्र, तरीही सभेत येण्यासाठी वाहन पाठविण्यात यावे, असा आग्रह काही सदस्यांचा दिसून येत आहे.
सभापती ही ताटकळले, अर्धा तास उशिराने सुरू झाली सभा
पुढील महिन्यात होणाऱ्या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत एकूण चार सदस्य हजर होते. कोरम पूर्ण होण्यासाठी एका सदस्याची गरज होती. त्यातच काही सदस्यांनी रितसर रजा टाकली होती. एका नगरसेविकेला सभापतींनी फोन लावून सभेत येण्याची विनंती केली. मात्र, माझ्याकडे गाडी नसल्याने घरी जर गाडी पाठविली तरच सभेत येणार असा दमच नगरसेविकेने भरला. नाईलाजास्तव सभापतींना गाडी पाठवावी लागली, त्यानंतर संबधित नगरसेविका सभेत हजर झाल्या व सभेला सुरुवात झाली. सभा नियमित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने घेण्यात आली.
कोट..
सभा वेळेवरच सुरू झाली, कोणत्याही सदस्याने दम भरला नव्हता. असा कोणताही प्रकार सभेदरम्यान झालेला नाही.
-रंजना सपकाळे, सभापती, महिला व बालकल्याण समिती