जळगाव : दुकानावर दूध घ्यायला जात असलेल्या पंधरा वर्षीय मुलीला अंधाराचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने तोंड दाबून रस्त्याच्या बाजूला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली असून या प्रकरणी बालकल्याण समितीने पीडितेचा जबाब नोंदविला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ८, ५ (ज) ६, ७, ९ अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुरुवारी हा गुन्हा रामानंदनगर पोलिसांकडे वर्ग झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात रात्री ९.३० वाजता पीडिता दुकानावर दूध घ्यायला जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून रस्त्याच्या कडेला ओढत नेले. नंतर तेथून पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपिंगकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या राजीव गांधी नगराच्या मोकळ्या जागेत नेऊन अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता कमालीची घाबरली होती. कुटुंबानेही भीती व बदनामीपोटी तक्रार दिली नाही. बुधवारी पीडितेने कौटुंबिक वादातून फिनाईल प्राशन केले. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला.
बाल कल्याण समितीने नोंदविला जबाब
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती काहीही सांगण्यास तयार नव्हती. कुटुंबही बोलायला तयार नव्हते, मात्र प्रकरण गंभीर असल्याने बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. समितीने पीडिता तसेच कुटुंबीयांना विश्वासात घेऊन बोलते केले असता नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पीडितेने दिली. अंधार असल्याने अत्याचार करणाऱ्याला ओळखता आले नाही, असे पीडितेने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर घटनास्थळ रामानंद नगरच्या हद्दीत असल्याने गुरुवारी हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला.