स्पर्श ही मूळातच अनुभवण्याची गोष्ट आहे. नुसत्या इतरांच्या सांगण्यावरून आपण त्या स्पर्शातील भाव समजून घेऊ शकत नाही.स्पर्शात वेगवेगळे भाव असतात. हे जसे आपल्याला स्पर्श झाल्यावर लक्षात येते. तसेच आपल्या स्पर्शाने ते दुसऱ्यालाही कळते याचेपण भान ठेवावे.लहान मुले व ज्येष्ठ व्यक्ती यांना ते विशेष जाणवत असावे असे वाटते. यांना प्रेमाचा, वात्सल्याचा व आपल्या माणसाचा स्पर्श लगेच कळतो. एकाच व्यक्तीचा स्पर्श वेगवेगळ्या वेळी वेगळ्या स्वरुपाचा असतो व तो ज्याला स्पर्श झाला आहे त्याला जाणवत असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास आईचा आपल्या तान्हुल्याबाबत त्याला उठवताना, त्याला भरवताना, त्याला खेळवताना व त्याला अंगाई गीत म्हणत थोपटताना केलेल्या प्रत्येक स्पर्शाच्या वेळचे मनातील भाव हे वेगळे असतात. आईच्या ममतेने हे भाव वेगळे आहेत हे तिला जाणवले नाही तरी तान्हुल्याला जाणवत असतात. याच स्पर्शाच्या वेगवेगळ्या भावांमुळेच या प्रत्येक वेळी उठताना, जेवताना, खेळताना, निजताना त्याच्या चेहºयावरचे भाव वेगळे असतात. हा स्पर्श व त्यातील समजलेले भाव यावरच मुलाचा प्रतिसाद असतो.उठवताना मायेचा, तर भरवताना वात्सल्याचा स्पर्श असतो. खेळवताना खोडकरपणाचा, तर निजवताना हळुवार शांततेचा स्पर्श असतो. मायेचा, आईचा, पितृत्वाचा, मैत्रीचा, विश्वासाचा, शाबासकीचा, सांत्वनाचा, प्रेमाचा, सहानुभूतीचा असे अनेक प्रकारचे स्पर्श असू शकतात व हे त्या त्या वेळी जो स्पर्श करतो त्याच्यामार्फत स्पर्श होणाºया व्यक्तीला जाणवतात.बºयाचदा फक्त स्पर्शाने व्यक्ती बोलत असल्याचे जाणवते व त्या बोलण्याच्या स्पर्शालासुद्धा त्याच पद्धतीने उत्तर मिळत असते. फक्त याचे उत्तर समोरच्याच्या डोळ्यातून किंवा हालचालीतून व्यक्त होत असते. हे पटवून घ्यायचे असेल तर मुक्या व पाळीव प्राण्यांना स्पर्श करून पहा. जे स्पर्श काही हेतू मनात ठेऊन केले असतील तर स्पर्श करण्याच्या जागाही ठरलेल्या असतात. जसे लहान मुलांना प्रेमाने स्पर्श करताना साधारण त्यांच्या गालांना हळूवारपणे स्पर्श केला जातो. कुणाचे कौतुक करायचे असेल तर पाठीवर प्रेमाने थोपटून स्पर्श करतात. आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा किंवा आशीर्वाद देताना डोक्यावर स्पर्श केला जातो, तर आपल्यापेक्षा मोठ्या व आदरणीय व्यक्तींना किंवा देवताना आपण चरण स्पर्श करतो व त्यांचा मान ठेवत असतो. स्पर्शाची ही रुपे अनुभवावीच लागतात हे मात्र नक्की.कौस्तुभ परांजपे, जळगाव
स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:19 PM