जळगाव : शासनातर्फे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता येण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे जळगाव आगारातून मंगळवारपासून नाशिक, कल्याण, औरंगाबादला प्रत्येकी एक फेरी सोडण्यात येणार आहे. तसेच उत्पन्नात नेहमी आघाडीवर असलेल्या काही आगारांतूनही लांब पल्ल्याच्या मार्गांवर बसेस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही तालुक्यांना बससेवा सुरू आहे. तब्बल महिनाभरापासून महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाले आहे.
मात्र, आता ३१ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता करण्यात येणार असल्यामुळे महामंडळाने टप्प्या-टप्प्याने काही गावांना बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जळगाव आगारातून नाशिक, कल्याण, औरंगाबाद, धुळे या ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. यात कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच रावेर आगारातूनही कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, भुसावळ या आगारांतून काही लांब पल्ल्याच्या गावांना बसेस सोडण्याचे महामंडळ प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील स्थानिक तालुक्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद असल्यावरच बसेसच्या फेऱ्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
...तर नियमांचे पालन करूनच बसमध्ये प्रवेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याची परवानगी दिली असून, त्यानुसार ४४ आसनी बसमध्ये प्रत्येक बाकावर एक याप्रमाणे २२ प्रवाशानांच बसमध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकाकडे मास्क असल्यासच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, सोशल डिस्टंन्सिंगचे पुरेपूर पालन करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता, आता सर्व सामान्य नागरिकानांही बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.