चोपडा : तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्याची एक बाजू मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरणासह पूर्णत्वास येत आहे. मागील महिन्यात हेच काम संथ गतीने सुरू होते. मध्यंतरी ठेकेदाराने या कामावरील मजूर व वाहन व्यवस्था अन्यत्र ठिकाणच्या कामावर हलविल्याने येथील काम बंद अवस्थेत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची दखल घेऊन कामाला गती देण्यात आली आहे.
आता या रस्त्यावरून एका बाजूने वापरता येणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूकडील रस्ता दुरुस्ती कामालासुद्धा सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी दिली.
शहरातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी प्रयत्न
चोपडा शहर न.प. हद्दीतील गोरगावले रस्ता काँक्रिटीकरण कामाबाबत ठेकेदाराशी जगन्नाथ बाविस्कर यांनी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची पाणीपुरवठा पाइपलाइन व अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. याबाबत न.प.चे गटनेते जीवन चौधरी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पाइपलाइन काढणेकामी तात्काळ सुरुवात केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद सुशीर यांनी अतिक्रमित जागेबाबत भूमी अभिलेख विभागाकडे पत्र पाठविल्याचे सांगितले आहे. रस्ता मोकळा होताच काँक्रिटीकरण कामास सुरुवात होऊ शकते. तरीही या रस्त्याचे त्वरित काँक्रिटीकरण व्हावे, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर गोरगावले येथील माजी सरपंच आशाबाई जगन्नाथ बाविस्कर, आदर्श घुमावल बुद्रुकचे सरपंच वसंतराव पाटील, एस.टी. कोळी संघटनेचे प्रतिनिधी मधुसूदन बाविस्कर, लखीचंद बाविस्कर, वैभवराज बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते भगवान वैदू यांच्यासह चोपडा शहर न.प. हद्दीतील नगरवासीयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.