चाळीसगाव, जि. जळगाव : यावर्षीचा दुष्काळ भयावह असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चाराही उपलब्ध नसल्याने शेतक-यांसह पशुपालकही धास्तावले आहेत. शासनाने तातडीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करुन पिण्याचे पाण्याचे टँन्कर सुरु करावे. पाण्याअभावी करपलेल्या फळबागांचे देखील तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी हिरापुर व वाघळी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर व वाघळी येथील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या.सकाळी नऊ वाजता पालकमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-याला सुरुवात झाली. चाळीसगाव शहरापासून आठ किमी अंतरावरील पश्चिमेला असणा-या हिरापुर येथे त्यांनी भेट दिली. यावेळी येथे सरपंच रंजना आबा वराडे यांनी दुष्काळी परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याकडे लक्ष वेधतांना टँन्करच्या फे-या बरोबर होत नाही. त्या दिवसाला सहा असाव्यात अशी मागणी केली. गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम थांबले असून वलठाण धरणातून योजनेसाठी पाणी उपलब्ध करुन दिले जात नसल्याचे सांगितले. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा. अशीही मागणी शेतक-यांनी केली.यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पिण्याच्या पाण्याबाबत काय समस्या आहे. याची माहिती गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडून घेतली. टँकरच्या सहा फे-या शनिवारपासूनच सुरु करा अशा सुचना केल्या. चारा छावण्यांबाबत संस्थांनी पुढे यावे. त्यांना यासाठी अनुदान दिले जाईल. चारा छावण्या व्यक्तीला नव्हे तर संस्थांना दिल्या जातात.वाघळी येथे फळबागांची पाहणीवाघळी येथे पालकमंत्र्यांनी भडगाव रोड लगतच्या रमाकांत महाजन यांच्या लिंबू तर अशोक व अभिमन्यू महाजन या दोन्ही बंधूंच्या लिंबूसह चिकु बागेची पाहणी केली. पाणी नसल्याने फळबागांचे नुकसान झाल्याची कैफियत शेतक-यांनी मंत्र्यांना ऐंकवली. जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे यांनी फळबागांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान मिळवून देण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शासन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून 'मागेल त्याला चारा, मागेल त्याला पाणी' अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी अश्वासित केले. दुष्काळग्रस्तांना शासन वा-यावर सोडणार नाही. दुष्काळ असतांना सुरु करावयाच्या आठ उपाययोजनांसाठी शासन बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी, चारा आणि रोजगार यांना शासन स्तरावर प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले.दौ-यात त्यांच्या समवेत आमदार उन्मेष पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पं.स.सदस्य भाऊसाहेब पाटील, प्रा. सुनील निकम आदी उपस्थित होते. दरम्यान वाघळी गावात गेल्या ९० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असून पालकमंत्र्यांनी गावात येऊन गावक-यांना धीर देणे गरजेचे होते. त्यामुळे हा दुष्काळ पाहणी दौरा एक फार्स होता. असा आरोप सरपंच विकास चौधरी यांनी केला आहे.दरम्यान, पारोळा तालुक्यातील तरवाडे येथेही पालकमंत्र्यांनी १० मिनिट भेच देऊन चर्चा केली.
चाळीसगाव, पारोळा दौ-यादरम्यान पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 1:33 PM