नगरदेवळा, ता. पाचोरा : शेतकऱ्यांचे जीवन कष्टप्रद असले तरी नैसर्गिक प्रयोगशीलता अंगीकारल्यास एकरी दोन ते तीन लाखाचे अपेक्षित उत्पन्न घेत जीवन आनंदाने फुलवत यशस्वी शेतकरी होता येते. हे नगरदेवळ्यातील उद्योजक शेतकरी नामदेव विश्राम महाजन यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
आपल्या उद्योग व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक असलेल्या नामदेव महाजन यांना एसपीएनएफ (सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती)ची आवड व ओढ लागल्याने त्यांनी तडक आपल्या मूळगावी नगरदेवळा येथे येऊन, रासायनिक शेतीस फाटा देत विषमुक्त नैसर्गिक शेतीस प्रारंभ केला. या प्रयोगाच्या दुसऱ्याचवर्षी त्यांना उत्पन्नाचा फुलोरा वाढल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यात आणखी अभ्यास व माहिती मिळवत फक्त एका गायीच्या शेण व गोमूत्रापासून स्वनिर्मित जीवामृत व घन जीवामृताच्या प्रयोगात ३० एकर नैसर्गिक शेती करता येत असल्याचे दाखवून दिले.
नामदेव महाजन यांनी गेल्या आठ वर्षांपासून कोणतीही रासायनिक खते किंवा पेस्टिसाईडची फवारणी न करता शुद्ध जीवामृत व घनामृताचा वापर करत केळी, निंबू, मोसंबी, कारले, काकडी, वांगे व इतर सर्व पिके मोठे उत्पन्न व मोठ्या नफ्याने घेत नैसर्गिक शेती फायद्याची व कर्जमुक्त करणारी असल्याचे सिद्ध केले.
या सर्व पिकांवर फवारणीसाठीदेखील ते नैसर्गिक द्रावणाचाच वापर करतात. या शेतातीलच झाडपाला, सीताफळ, रानरूई, घानेरी, तंबाखू, वाया गेलेली मिर्ची, लसूण, आदी पालापाचोळा गोमूत्रात उकळवून दशपर्णी, निम अस्र, ब्रम्हास्र, अशी कीटकनाशके शेतातच तयार करून पिकांवर फवारणी केली जाते. यामुळे निरोगी पिकांचे जास्त उत्पन्न मिळते व शेतकरी कर्जमुक्त होऊन, निश्चिंत होतो.
या पद्धतीचा नैसर्गिक भाजीपाला जास्त दिवस टिकण्यासोबतच शारीरिक प्रतिकार शक्तीही बलवान करते, जमिनीचा पोत सुस्थितीत येऊन नापिकी होण्याचे टळते. एकंदरीत विषमुक्त नैसर्गिक शेती केल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असल्याने शेतकऱ्यांनी या पद्धतीकडे वळावे, असे आवाहनही नामदेव महाजन यांनी केले.
===Photopath===
240521\24jal_15_24052021_12.jpg~240521\24jal_16_24052021_12.jpg
===Caption===
विषमुक्त नैसर्गिक शेतीने फुलविले जीवन~विषमुक्त नैसर्गिक शेतीने फुलविले जीवन