लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाच्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमधून सावरत नाही तोच आता पुन्हा अनेक निर्बंध लादण्यात येऊन व्यापार बंद झाल्याने व्यापारी वर्ग मेटाकुटीस आला आहे. व्यापारी कोरोनामुळे नाही तर सततच्या लॉकडाऊन व निर्बंधांमुळे मृत्युमुखी पडेल, अशा संतप्त भावना जळगावातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. सोमवारी सकाळी आदेशाच्या प्रतीक्षेत अनेक व्यापारी दुकानाबाहेर येऊन थांबलेले होते मात्र कोणतेही आदेश न निघाल्याने ते माघारी परतले.
वीकेंडचा लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी काही सकारात्मक आदेश येतील या अपेक्षेने अनेक व्यापारी फुले मार्केट व इतर ठिकाणी आपल्या दुकानासमोर येऊन थांबले होते, मात्र कोणताही निर्णय न झाल्याने त्यांची निराशा झाली. यावेळी त्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत पूर्वीच्या सहा महिन्यातून आता सावरत नाही तोच पुन्हा लॉकडाऊन लावल्याने घर कसे चालवायचे, बँकांचे हप्ते कसे फेडायचे असे प्रश्न उपस्थित केले. या निर्बंधांमध्ये इतर व्यवसायांना परवानगी दिली जाते मात्र व्यापारी वर्गाला वेठीस का धरले जात आहे, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
यावेळी सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी व इतर व्यावसायिक उपस्थित होते, त्यांनी व्यापाऱ्यांविषयी सकारात्मक भूमिका घेत मार्ग काढण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर विविध संदेश व्हायरल
व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावर विविध संदेश वायरल केले. यामध्ये व्यापारीवर्ग कोरोनाने नाही तर लॉकडाऊनने मरणार, लॉकडाऊन हटाव व्यापारी बचाव, मै एक व्यापारी हूं लॉकडाऊन का निषेध करता हूं, महाराष्ट्र मे कोरोना पहिले खत्म होगा या व्यापारी, असे वेगवेगळे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले.