पारोळा: गुरुवारी लग्नाची मोठी तीथ असल्याने येथील महामार्ग ४६ वर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली. सकाळी १० वाजेपासून वाहतुकीची कोंडी निर्माण होवून अनेक नववधू आणि वर तसेच वºहाडी मंडळीही अडकून पडले. यामुळे सर्वांना खूप मनस्ताप सहन करावा लागला .पारोळा शहरालगत असलेल्या या महामार्गावर वाहतूक ठप्प होणे, हे नित्याचेच झाले आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी रविवारी तर सर्वांना वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ज्या दिवशी लग्न तिथी असते त्या दिवशी किमान ३ ते ४ तासांची वाहतूक कोंडी ठरलेली आहे .गुरुवारी १८ रोजी अमळनेर चौफुली, कजगाव चौफुली, चोरवड चौफुली या तिन्ही चौफुली वर सर्वात जास्त वाहतुकीची कोंडी झाली होती. या तिन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणी बस चालक, दुसऱ्या ठिकाणी कार चालक आणि तिसºया ठिकाणी ट्रक चालकाने आपली वाहने आडवी केल्याने सर्व वाहतुक ठप्प झाली. वाहतूक पोलीस हे वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. पण काही वाहने एकमेकांत अडकल्याने ते काढणे मुश्किल झाले. वºहाडाच्या गाडीतील काहींनी वाहतूक पोलीसांची भूमिका देखील केली. पण हताश होऊन ते पुन्हा गाडीत जाउन बसले. झालेल्या गैरसोयीबद्दल केवळ मनस्तापच सहन करावा लागला.
पारोळा महामार्गावर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 3:52 PM