गुंठेवारीसाठी मागविले प्रस्ताव
जळगाव - शहरातील गावठाण भागातील लेआऊटला मंजुरी न मिळाल्याने गुंठेवारीतील रहिवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ मिळालेल्या भूखंडधारकांसाठी मार्च २०२२ पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. शहरातील इंजिनिअर व आर्किटेक्टमार्फत प्रस्ताव सादर करून नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. अन्यथा मुदतीनंतर त्या भागातील सर्व सेवा बंद करून अतिक्रमण विभागामार्फत बांधकामे निष्कासित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
भंगार बाजाराबाबतही आदेश नाही
जळगाव - शहरातील अजिंठा चौकातील भंगार बाजाराची मुदत संपून आता अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाकडून भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच याबाबत महासभेत ठरावदेखील करण्यात आला असून, याबाबतची सुनावणी प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. मात्र, महापालिोच्या प्रशासनाकडून या ठिकाणची कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
गाळेधारकांकडून ७ कोटींची वसुली
जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची वसुली करण्याची मोहीम सुरूच असून, आतापर्यंत महापालिकेने सात कोटींची वसुली केली आहे. महापालिकेकडून लवकरच याबाबत सुनावणी प्रक्रिया करून पुढील कारवाई केली जाणार आहे. महापालिकेकडून गाळेजप्तीची मोहीमदेखील राबविली जाणार आहे.