रस्त्याच्या बाजूला खोदकाम
जळगाव : नेरी नाका ते पांडे चौकादरम्यानच्या रस्त्याच्या बाजूचा रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून शिवाय आहे त्या रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने या रस्त्यावरून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असल्याने सोमवारी या रस्त्यावर वाहनांची गर्दी होती.
मृत्यूंची संख्या १ हजारांवर
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाबाधित मृतांची संख्या ही १ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार ही संख्या १००३ वर पोहोचली आहे. दरम्यान, या ठिकाणी केवळ गंभीर रुग्णांना दाखल करण्यात येत असल्याने मृत्यूंची संख्या अधिक असल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात अन्यत्र कुठेही कोरोना रुग्णांना दाखल केले जात नव्हते.
पारोळ्यात सर्वात कमी मृत्यू
जळगाव : जिल्हाभरात पारोळा व बोदवड या दाेन तालुक्यांत प्रत्येकी ४७ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून ही संख्या जिल्हाभरात सर्वात कमी आहे. यासह भडगाव तालुक्यात ७६ मृत्यूंची नोंद आहे. अन्य सर्व तालुक्यांमध्ये १०० पेक्षा अधिक जण कोरोनाने मृत्युमुखी पडलेले आहेत.