लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मल्लनिस्सारण योजनेसाठी रस्ते खोदले जात असून, यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरीलच रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांची व रुग्णालयात येणाऱ्यांची सोमवारी (दि.२८) मोठी तारांबळ उडाली. या ठिकाणी प्रचंड कोंडी होऊन हॉर्नच्या गोंगाटाने हा परिसर दणाणला होता.
काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रवेशद्वारासमोरील पूर्ण रस्ता खोदण्यात आला होता. त्यातच दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता सोमवारी खोदण्यात येत असल्याने वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठी कोंडी होत असल्याने रुग्णवाहिकांनाही आत व बाहेर जाण्यास कसरत करावी लागली. वाहनांच्या मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या होत्या. त्याच बी.जे. मार्केटसमोरही काम सुरू असल्याने हा रस्ता बंद आहे. त्यामुळे अधिकच कोंडी निर्माण झाली होती. दिवसभर हॉर्नचा गोंगाट या रुग्णालय परिसरासमोर कायम होता. पर्यायी रस्ताही खराब असल्याने रुग्णालयात जाणाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
रस्त्यांचे तीन-तेरा
ज्या ज्या ठिकाणी ही कामे झालेली आहेत, त्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. भजे गल्ली ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे असेच बारा वाजल्याने या ठिकाणाहून वाहने नेणे मोठे जिकिरीचे झाले आहे. आर.आर. विद्यालयाकडील रस्त्याचीही तीच अवस्था झाली आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने हे खड्डे बुजवण्यात आल्याने वाहनधारकांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.