लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून जळगाव शहरातील शनी मंदिराकडे जाणारा वर्दळीचा रस्ता वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे. महापालिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने या भागात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत.
लेंडी नाल्यावरील रेल्वे पुलाखालून शनी मंदिराकडे जाताना चौघुले प्लॉटसमोर असलेला ममुराबाद जकात नाका पूर्वी सहज नजरेस पडत असे. वाढत्या अतिक्रमणांमुळे सदरचा नाका आता दिसेनासा झाला आहे.
शिवाजीनगरातील पूल वाहतुकीस बंद झाल्यापासून लेंडीनाल्यावरील रेल्वे पुलाखालील रस्त्यावरची वाहतूक चारपटीने वाढली आहे. मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे नाका परिसरातील रस्त्याची रुंदी खूपच कमी झाल्यामुळे याठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याच्या घटना देखील घडू लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणांकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
(फोटो- ०५सीटीआर०३)
जळगाव शहरातील ममुराबाद नाक्याजवळ वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि त्यातून वाट काढतांना दुचाकी व चारचाकी वाहनधारक. (जितेंद्र पाटील)