पारोळा : वाहतुकीची कोंडी ही पारोळावासीयांच्या जणू पाचवीलाच पूजली आहे. दररोज सकाळ झाली म्हणजे चोरवड, कजगाव या चौफुलीवर वाहतुकीची कोंडी ही पाहण्यास मिळते. या चौफुलीवर वाहने मागे-पुढे घेताना वाहने फसतात आणि मग सुरू होतो तो वाहनांचा कर्कश आवाज. चित्रविचित्र हॉर्न हे दररोज नित्यनियमाने होत असल्याने या वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतुकीची कोंडी केव्हा सुटणार व शहरवासीयांचे ग्रहण अजून किती दिवस राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन रखडले आहे. आजही चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे.
जोपर्यंत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत वाहतुकीच्या कोंडीला पारोळा शहरवासीयांना तोंड द्यावे लागणार आहे.
नागरिक कंटाळले
पारोळा शहरात दररोजच्या वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला नागरिक जाम कंटाळले आहेत.
किमान या दोन्ही चोरवड व कजगाव चौफुलीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची सकाळ व सायंकाळी ड्युटी लावण्यात यावी.
दिवसभरात दोन वेळेस वाहतूक पोलिसाची या ठिकाणी नियुक्ती केल्यास वाहनधारकांसह नागरिकांची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
दोन वेळेस वाहतूक पोलिसाची नियुक्ती करणे शक्य नसेल तर कमीत कमी सणा-सुदीच्या काळात तरी वाहनधारकांचे व नागरिकांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे हाल थांबविण्यासाठी पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे.
गुरुवारचा असाही अनुभव
१५ रोजी सकाळी १० वाजता चोरवड चौफुलीवर एक ट्रक व बस चौफुलीवरून वळण घेताना ही दोन्ही वाहने फसली आणि वाहतूक कोंडी झाली.
यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ज्याला जाण्याची घाई होती.
त्या वाहनातून प्रवासी उतरून वाहतूक सुरळीत करून आपले वाहन या कोंडीतून काढून मार्गस्थ होताना दिसून आले.