आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी थेट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम (पांडेल) येथून अलिशान कारमधून गांजाची तस्करी करणाºया सुनील माधवराव मोहीते (वय २४, रा.कनाशी, ता.भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कजगाव, ता.भडगाव येथे पकडले. त्याच्याकडून साडे सहा लाख रुपये किमतीचा गांजा व साडे तीन लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे.
कनाशी येथील एक तरुण आंध्र प्रदेशातून अलिशान कारमधून गांजा आणून तो डी.जे.च्या गाडीतून गावोगावी विक्रेत्यांना होलसेल भावात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे हे स्वत: शनिवारी रात्री पथकासह कजगाव भागात गेले होते. कुराडे, रामकृष्ण पाटील व महेश पाटील या तिघांनी वेशांतर करुन चाळीसगाव-भडगाव दरम्यान एका ठिकाणी डी.जे.ची गाडी थांबविली. आमच्याकडे लग्न आहे, त्यासाठी डी.जे.लावायचा आहे असे सांगून चालक सुनील मोहीते याची चौकशी करायला सुरुवात करताच लांब अंतरावर थांबलेले उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र गायकवाड, दिलीप येवले, सतीश हळणोर, विनोद पाटील, रवींद्र घुगे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, अशोक चौधरी, दत्तात्रय बडगुजर, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, प्रकाश महाजन, मनोज दुसाने, शरद सुरळकर, रामचंद्र बोरसे, गफूर तडवी, प्रविण हिवराळे, जयंत चौधरी व इद्रीस पठाण यांनी गाडीला गराडा घातला. पोलिसांचा ताफा पाहून मोहीतेची भंबेरी उडाली. गाडीचा तपासणी केली असता त्यात साडे सहा लाख रुपये किमतीचा ६५ किलो गांजा आढळून आला.
भडगावला कमी किमतीत गांजा मागितल्याने फसला भडगाव येथे सुरेश नावाचा एक जण गांजा विक्रीचा व्यवसाय करतो. तो मोहितेकडून गांजा विकत घेणार होता, त्यानुसार मोहीते त्याच्याकडे गेला, मात्र त्याने अगदी कमी किमतीत गांजा मागितला, त्यामुळे त्याला गांजा न देता तो तेथून माघारी फिरला व नगरदेवळा स्टेशनजवळ कारमधील गांजा डी.जे.च्या गाडीत टाकून दुसरा ग्राहक शोधण्यासाठी कजगावकडे येत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याविरुध्द भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहीते याला अटक करण्यात आली आहे.