नंदुरबार : चक्रीवादळात डनेल, ता.धडगाव येथील जीवनशाळा उध्वस्त झाली आहे. नर्मदा विकास विभागाने जुलै महिन्यात दुरूस्ती करूनही ही अवस्था झाल्याने नर्मदा नवनिर्माण अभियानाने या नाराजी व्यक्त केली आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित डनेल येथे नर्मदा जीवनशाळा चालविण्यात येते. या शाळेची दुरूस्ती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आल्यानंतर नर्मदा विकास विभागाने शाळेची तात्पुरती दुरूस्ती दोन महिन्यांपूर्वी केली होती. परंतू नुकत्याच आलेल्या चक्री वादळात या शाळेचे कार्यालय व जनता निवास तसेच स्टोअर रूम उडून गेले आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने सुटी असल्याने यावेळी विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवीत हाणी झाली नाही. परंतू शालेय साहित्य आणि इतर साहित्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरवर्षाच्या पावसाळ्यात नर्मदा जीवनशाळा डनेल व मणिबेली या उडून जातात व दुरूस्तीच्या नावाखाली नर्मदा विकास विभाग निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्यामुळेच ही परिस्थिती वारंवार उद्भवते असा आरोप नर्मदा नवनिर्माण अभियानाने केला आहे. या बाबीची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.