लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात केलेले ५० रूपये प्लॅटफार्म तिकीट पुन्हा १० रूपये केले आहे. तिकीटाची किंमत कमी केल्यामुळे आणि त्यात कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्यामुळे प्लॅटफार्म तिकीट काढण्यांची संख्या वाढली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. गेल्या वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गाड्या रद्द केल्या असून, सध्या ५० टक्केच रेल्वे सुरू आहेत.
मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने १० मार्च २०२० पासून प्लॅटफार्म तिकीट ५० रूपये केले होते. त्यानंतर २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने, प्लॅटफार्म तिकीट विक्रीही बंद करण्यात आली होती. वर्षभर प्लॅटफार्म तिकीट विक्री बंद ठेऊन, यंदा १० मार्च पासून पुन्हा प्लॅटफार्म तिकीटाची विक्री सुरू करून, ५० रूपयेच तिकीट दर ठेवला होता. तिकीटाचा दर वाढवला असला तरी, प्रवाशांमधुन बऱ्यापैकी तिकीटांची मागणी होती. तीन महिने ५० रूपये तिकीट दर ठेवल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने १० जून पासून पुन्हा ५० रूपयांवरून १० रूपये तिकीट दर केला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे आता प्रवाशांची मागणीही वाढली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इन्फो :
स्थानकातून दररोज जाणाऱ्या रेल्वेची संख्या :५०
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या : २ हजार
इन्फो :
तिकीट वाढले तरी ...
रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म वरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी प्लॅटफार्मचे तिकीट १० वरून थेट ५० रूपये केले होते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश पॅसेंजर आणि प्रवासी गाड्या बंद असल्यामुळे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी होती. बोटावर मोजण्या इतक्याच गाड्या सुरू असल्यामुळे, प्लॅटफार्म तिकीटाची किंमत वाढवूनही स्थानकांना कमाई करता आली नसल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
गेल्या आठवड्यापासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यानंतर, रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेषत : परप्रातांतून येणाऱ्या जळगाव मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या हावडा एक्सप्रेस, पवन एक्सप्रेस, काशी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, कामायानी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस या गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. यामुळे तिकीट आरक्षण मिळणे अवघड झाले आहे.
इन्फो :
प्लॅटफार्म तिकीटातून कमाई
१) २०१९ : ४१ लाख
२) २०२० : ४ लाख २० हजार
३) २०२१ : ४ हजार ५०० रूपये
इन्फो :
स्टेशन मास्तरांची प्रतिक्रिया
अनलॉक नंतर आता मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. गावाकडे गेलेले परप्रांतीय बांधव पुन्हा कामासाठी मुंबई-पुण्याकडे येत आहेत. त्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या बहुतांश गाड्यांना प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. तसेच यामुळे मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणे अवघड होत आहे. तसेच आता कोरोनामुळे बंद केलेल्या गाड्याही पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
- अमरचंद अग्रवाल, स्टेशन प्रबंधक, जळगाव रेल्वे स्टेशन.