खडकदेवळा, ता.पाचोरा : नियमितपणे विद्यार्थी जळगावला महाविद्यालयात रेल्वेतून प्रवास करीत होता. गाडीतील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो धावत्या रेल्वेतून अचानक खाली पडला. मात्र त्याचा जीव वाचविण्यासाठी रेल्वे चक्क दीड किमी मागे धावली आणि जखमी अवस्थेतील त्या तरुणावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठविले. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान माहिजीजवळ घडली.६ रोजी ५११८१ क्रमांकाच्या देवळाली-भुसावळ शटलमधून दररोज अपडाऊन करणारा राहुल संजय पाटील (वय २२) हा विद्यार्थी जळगाव येथे आय.एम.आर. कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. राहुल हा ६ रोजी पॅसेंजर (क्र.५११८१) मध्ये गर्दीत चढला व माहिजीजवळील रेल्वे खंबा क्र. ३८३ जवळ धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत तत्काळ ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना कळविले. पाटील यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस.टी. जाधव यांना घटनेबाबत माहिती दिली असता जाधव यांनी परधाडे येथील सहाय्यक स्टेशन मास्टर के.जे. बर्डे व माहिजी येथील सहाय्यक स्टेशन मास्टर ए.एस. पाल यांच्याशी संपर्क करुन आर.पी.एफ. विभागालाही याबाबत माहिती दिली. त्यानंतर पॅसेंजर थांबविण्यात आली. गार्ड व ड्रायव्हर यांनी आपसात चर्चा करून चौकशी केली. संघटनेकडून प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनीही ड्रायव्हरला विनंती आदेश केले. यावेळी प्रशासनाने माणुसकीची किंमत ठेवत देवळाली-भुसावळ शटल चक्क एक ते दीड किमी मागे घेत रेल्वे लाईनवर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल यास पॅसेंजरमध्ये बसविले. पुढील म्हसावद स्टेशनवर त्याच्यावर प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले.ट्रेन मागे घेण्यात आल्याने व संबंधिताला वाचविण्यात यश आले. रेल्वे ड्रायव्हर, गार्ड व पाचोरा रेल्वे प्रशासनाचे आभार प्रवासी वगार्तून मानण्यात आले. अशा गर्दीला पर्याय म्हणून रेल्वेगाड्या वेळेवर धावणे, शटलला वाढीव कोच जोडणे, स्वतंत्र एम.एस.टी. कोच जोडणे, याबाबत तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
परधाडे- माहिजीदरम्यान रोजच्या वाढत्या गर्दीमुळे व ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस रोजच ३ ते ४ तास उशिरा धावत असल्यामुळे तसेच पयार्यी रेल्वे नसल्याने शटलचा सहारा सर्वच नियमित ये-जा करणारे प्रवासी घेतात. यामुळे या पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यातून असे अपघात नित्याचेच होत असल्याने प्रशासनाने यावर उपायोजना करणे गरजेचे आहे.