जळगाव : सद्यस्थिती शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात सुरू असलेले स्वच्छतेचे काम चांगले आहेच मात्र, त्यातही शास्त्रोक्त पद्धतीने कशा सुधारणा करण्यात येतील, यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जंतू नियंत्रण समितीची बैठकीत घेण्यात आला आहे. समितीची शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.
समिती सदस्य सचिव तथा सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रुग्णालयातील जंतूनियंत्रणाविषयी सद्यस्थिती सांगितली. समितीचे ध्येय हे रुग्णालयाचा परिसर स्वच्छ व निर्जंतुक राहावा याबाबत श्रेणीवर्धन करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयात काम करणारे अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचार्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असावा यासाठी सूचना देण्यात आल्या. त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वॉर्डात साफसफाई शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी, जैविक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, याचे कर्मचाऱ्यांना तर रुग्णालय परिसर स्वच्छ राहावा यासाठी रुग्णांचे नातेवाईकांना जनशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा रुग्णालय निर्जंतुक राहावे यासाठी इतर मॉडर्न रुग्णालयांचा अभ्यास करून आणखी अद्ययावतपणा कसा आणता येईल त्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे डॉ. इंगोले यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, अधिसेविका कविता नेतकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सपकाळे ह्यांच्यासह सर्व विभागप्रमुख, विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण अधिकारी, परिचर्या उपस्थित होते.