गैरसोय : डाऊनच्या गाड्याही रद्द राहणार
जळगाव : तौक्ते चक्रीवादळा नंतर आता गुजरात आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर ''यास'' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी व मंगळवारी गुजरात व ओडिसाकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मिळून आठ सुपरफास्ट गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे गुजरातकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आल्या असून, आता पुन्हा ‘यास' चक्री वादळ आठ सुपरफास्ट रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे चक्रीवादळ गुजरात आणि ओडिसा च्या किनार पट्टीवर धडकणार असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या आठ गाड्या दोन दिवस रद्द केल्या आहेत. दरम्यान, तौक्ते वादळामुळे या वादळाची तीव्रताही अधिक राहिली तर या गाड्या आणखी काही दिवस रद्द होण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. रद्द केलेल्या या सर्व गाड्यांना जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असून, या वादळामुळे गुजरात व ओडिसाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
इन्फो :
चक्रीवादळामुळे या गाड्या आहेत रद्द
यास या चक्रीवादळा मुळे रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव मार्गे गुजरात व ओडिसा कडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मिळून आठ गाड्या रद्द केल्या आहेत. या मध्ये गाडी क्रमांक(०२०३७) पुरी अजमेर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२०३८) अजमेर-पुरी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२१४५) पुरी विशेष एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२१४६) पुरी विशेष एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२८४४) अहमदाबाद पुरी एक्स्प्रेस,गाडी क्रमांक(०२८४३) पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२८२८) सुरत-पुरी एक्स्प्रेस व गाडी क्रमांक(०८४०५) अहमदाबाद पुरी विषय एक्स्प्रेस या अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्या रद्द केल्या आहेत.
इन्फो :
तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार
रेल्वे प्रशासनातर्फे चक्रीवादळामुळे ज्या गाड्या रद्द केल्या आहेत, त्या गाड्यांचा पूर्ण परतावा प्रवाशांना देण्यात येणार आहे.तिकिटांचा परतावा घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर कार्यालयीन कामकाजाच्या वेळी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.