लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलीस दलातील शिपाई ते साहाय्यक फौजदार या संवर्गातील बदलीपात्र अमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय प्राप्त झालेली आहे. मात्र त्याला शासन आदेशाचा ब्रेक लागला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून सर्व बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. हा आदेश पोलीस दलालाही लागू असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललेला आहे, त्यामुळे शासनाने ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश ज्या दिवशी निघाला त्याच दिवशी सायंकाळी अप्पर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी पोलीस दलाचा आदेश काढला व त्यात बदल्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
काय आहेत महासंचालकांचे आदेशअप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल (आस्थापना) यांनी १० मे रोजी बदल्यांबाबत आदेश जारी केले आले आहेत. विहित कालावधी पूर्ण झालेले, विहित कालावधीत पूर्ण नाही परंतु, मुदतपूर्व बदलीसाठी सादर केलेली लेखी विनंती व प्रतिकूल अहवालावरुन करावयाची बदली या तीन प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या आदेशात जारी केलेल्या आहेत. बदलीपात्र असलेल्या अमलदाराकडून माहिती मागविताना त्यांचे तीन पसंतीक्रम मागवून घ्यावे, बदलीवर नेमणूक देतांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार तसेच पूर्वीच्या घटकास झालेला कालावधी विचारात घेऊन त्यांना उदाहरणार्थ जास्त कालावधी झालेल्या अंमलदारा पहिला पसंतीक्रम देण्यास प्राधान्य व त्यानंतर त्या क्रमानुसार दुसर्या व तिसर्या पसंतीच्या ठिकाणी नेमणूक देण्याची कार्यवाही करावी. जर तीनही पसंतीच्या ठिकाणी पदे रिक्त नसल्यास अन्य ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.
प्रभारी अधिकारी बदलण्याचे संकेत
जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये तसेच व अकार्यकारी शाखेत असलेले प्रभारी अधिकारी नवीनच आहेत. मात्र राज्यस्तरावर परमविर सिंह व सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाचे पडसाद राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये उमटत आहेत. जळगाव जिल्ह्यातही काही संकेत असून महत्त्वाच्या पदावरील प्रभारी अधिका-यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उचलबांगडीचे संकेत मिळाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी मुंबईवारीही केलेली आहे.
कोट....
३० जूनपर्यंत बदल्यांना स्थगितीचा शासन आदेश पोलीस दलालाही लागू आहे. जिल्हा पोलीस दलातील बदलीपात्र अमलदारांची माहिती तयार आहे. स्थगिती संपताच बदल्यांचे आदेश काढले जातील. यावेळी अंमलदारांना प्रत्यक्ष बोलावले जाईल.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक