अमळनेर : चोपडाव अमळनेर तालुक्याला जोडणारा तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अल्पावधीत या पुलालगतचा भराव खचला. रस्त्यावर खड्डे पडले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. मात्र तेवढा निधी मिळत नसल्याने, जलसंपदा विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे हस्तांतरण रखडलेले आहे. तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून 1999 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2011 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा हा पूल असल्याने, या पुलावरून वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर वाढली. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला असणा:या रस्त्याची दुर्दशा झाली. रस्त्यालगतचा असणारा भराव खचला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत,.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भराव काटेरी झुडपांनी वेढला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे.पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची आहे. पुलाच्या भरावांची आणि खडय़ांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 28 लाख रुपये खर्च लागणार आहेत. या वर्षी जलसंपदा विभागाला केवळ सहा कोटीचा निधी शासनाकडून मिळाल्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या चोपडा कार्यालयाने सांगितले.तर पुल सुस्थित असल्याशिवाय ताब्यात घेणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर कार्यालयाने स्पष्ट केले आहे.या पुलामुळे चोपडा,शिरपूर आणि मध्यप्रदेशाला जाण्यासाठीचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेतदेखील बचत होत असते,गेल्या पाच वर्षात पुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामानाने पुलाची आणि पुलाच्या भरावांची काळजी घेण्यात आली नाही.पूल जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची काळजी घेतली जात नाही. पुलाच्या हस्तांतर बाबत जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संयुक्तपणे पुलाला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी हस्तांतर प्रक्रिया सुरू केली आहे. (वार्ताहर)
जळोद-बुधगाव पुलाचे हस्तांतर रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 12:15 AM