दीपनगर, ता.भुसावळ : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर परिसरात तापी नदीच्या काठी व जुने रेस्ट हाऊसशेजारी असलेल्या स्मशानभूमीचा लोकवर्गणीतून कायापालट होत असून, बरेचसे काम पूर्ण झाले आहे.
दीपनगर स्मशानभूमीत विविध सुविधांचा अभाव होता. निंभोरा येथील शिवाजी नगरातील रहिवासी शेषराव नाईक यांची अंत्ययात्रा आठ महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळेस दीपनगर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणली होती, मात्र विजेची सुविधा नसल्याने त्यांच्यावर मोबाईलचा टॉर्च व स्वर्गरथाच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यविधीचा कार्यक्रम आटपावा लागला होता. याची दखल घेत स्मशानभूमीच्या विकासकामाची सुरुवात अभियंता मोहन यशवंत सरदार यांनी ‘मानव सेवा, ईश्वर सेवा’ या सामाजिक ग्रुपची निर्मिती ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोना काळात केली. या सामाजिक ग्रुपवरून स्मशानभूमीसाठी आर्थिक मदत मिळत आहे. सर्वप्रथम स्मशानभूमीच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. मृतांचे कपडे, वस्तू, अर्धवट जळालेली लाकडे इत्यादी उचलून परिसर स्वच्छ केला. मृतदेह दहन करण्यासाठी साधा ओटाही नव्हता. त्या ठिकाणी आर.सी.सी. ओटा बांधण्यात आला. लोखंडी ग्रील बसविले. असे दोन आर.सी.सी. ओटे व लोखंडी ग्रील तयार केले आहेत.
परिसराच्या सुशोभीकरणासाठी छोटी बाग तयार करून वृक्षांची नियमित मशागत सुरू असून सुंदरशी फुलबाग आज बघायला मिळते. या स्मशानभूमीचे ‘अमरधाम दीपनगर’ असे नामकरण करून भिंती रंगवल्या आहेत. अंतिम विसावा ओटा बांधण्यात आला आहे. चितेला प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय नव्हती. त्या ठिकाणी चारही बाजूने पाच फूट रुंद प्रदक्षिणा मार्ग तयार केला आहे. या अमरधाम स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांच्या बैठक व्यवस्थेसाठी ७५ हजार रुपये मूल्याचे सिमेंटचे २५ बाक स्मशानभूमी परिसरात बसवले आहेत.
एकंदरीत, गत सहा महिन्यांत खूप मोठे सहकार्य ‘मानव सेवा, ईश्वर सेवा’ या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून अभियंता मोहन सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि होत असलेले कार्य पाहून दाते मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत आहेत.
या अमरधाम स्मशानभूमीसाठी परिसरातील नामांकित लोकांनी अभियंता, ठेकेदार, कर्मचारी, कंत्राटी कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी आर्थिक व श्रमदान करून मदत केली आहे.
अशा परिस्थितीत दीपनगर, निंभोरा बुद्रुक व फेकरी परिसरातील नागरिकांनी या अमरधाम स्मशानभूमीसाठी श्रमदान करून मदत करावी व दीपनगर अमरधाम विकास उपक्रम यशस्वी करावा, असे अभियंता मोहन सरदार यांनी आवाहन केले आहे.
उपक्रम यशस्वितेसाठी मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, उपमुख्य अभियंता पुणेकर, सुनील रामटेके, अभियंता राजेंद्र निकम, मिलिंद खंडारे, डी.डी. पिंगळे, श्यामगोपाळ लाळ, सचिन कवितके, संतोष चंद्रमणी, किशोर शिरभय्यै, मुकेश तिवारी, हेमंत लहाणे, वीरेंद्रकुमार झा, चारुदत्त वांजळे, सुनील शेठ, रवी व्यास, सी.एम. सपकाळे व कॉन्ट्रॅक्टर, वीज कामगार, कंत्राटी कामगार, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.