नशिराबाद : महामार्ग चौपदरीकरण व उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले तरी महामार्गावरील नशिराबाद गावासाठी व्यवस्थित बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. महामार्गावर एका ठिकाणी महामार्ग प्राधिकरणने छोटेसे निवारा शेड उभारून नशिराबादकरांची थट्टाच केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कार्यालयासह सर्व सुविधांयुक्त बसस्थानकाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तालुक्याचे सरचिटणीस ललित बऱ्हाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू असून, यामुळे रस्ते मोठे होण्यासह भव्य उड्डाणपूल आकाराला येत आहे. मात्र, महामार्गावरच असलेल्या नशिराबाद गावासाठी व्यवस्थित बसस्थानक नसल्याने ग्रामस्थांसह बाहेर गावाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचेही हाल होत आहेत. येथील लोकसंख्या सुमारे ५० ते ६० हजार आहे. अनेक वर्षांपासून मध्यम तसेच लांब पल्ल्याच्या व सर्व बस नशिराबाद स्थानकात थांबून प्रवासी चढ-उतार करत होते. नशिराबाद येथून जळगाव, भुसावळ, अन्य ठिकाणी दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, महामार्गाचे चौपदरीकरण व उड्डाणपूल झाल्यापासून आता अनेक गाड्या बायपास जात आहेत. त्यामुळे बसस्थानक नावालाच राहिले आहे. सद्य:स्थितीत वाहतूक नियंत्रण कार्यालय अद्ययावत आहे. मात्र, आता महामार्गानेच सर्व बसेस वाहतूक होणार असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गावरच अद्ययावत बसस्थानक व वाहतूक नियंत्रण कार्यालय उभारून द्यावे, अशी मागणी निवेदनात ललित बऱ्हाटे यांनी केली आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गावाची लोकसंख्या बघता महामार्गालगत शासकीय, मालकीची किंवा खासगी जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तालुका दर्जाचे बसस्थानक उभारावे आणि रस्त्याचे चौपदरीकरण करीत असताना लांब पल्ल्याची वाहने उड्डाणपुलावरून बायपास जाणार नाहीत, याची दक्षता घेणे व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.