जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या धर्तीवर मुक्ताईनगर येथे मागील दोन वर्षापासून सुरू असलेले शासकीय कृषी महाविद्यालयदेखील मुख्यालयी म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शहरानजीकच्या निमखेडी येथील तेलबिया संशोधन केंद्रात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या वृत्ताला तेलबिया संशोधन केंद्रातील वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे. मुक्ताईनगर येथे 2015 मध्ये शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाले. सध्या ते खडसे महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्देशित दरांनुसार भाडय़ाच्या सहा खोल्यांमध्ये सुरू आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने नागपूर महामार्गालगत या महाविद्यालयाशी संबंधित प्रयोग व इतर कार्यक्रमासाठी 100 एकर जमीनही उपलब्ध झाली आहे. पण मुक्ताईनगरात महाविद्यालयाच्या मालकीची शासकीय इमारत, प्रयोगशाळा, सभागृह अशी सर्व अत्यावश्यक व्यवस्था होत नाही तोर्पयत हे महाविद्यालय निमखेडी येथील तेलबिया संशोधन केंद्राच्या अखत्यारित कार्यान्वित करण्याचा विचार कृषी विद्यापीठातील वरिष्ठांचा आहे. या संशोधन केंद्रानजीक असलेल्या शासकीय कृषी विद्यालयातील काही खोल्या व सभागृह, प्रयोगशाळा महाविद्यालयास उपलब्ध केल्या जातील. तसेच प्रयोगांसाठीची जमीन तेलबिया संशोधन केंद्राकडे उपलब्ध आहे. ती जमीन महाविद्यालयाकडे येईल, असा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर समोर आल्याची माहिती मिळाली. जामखेडचे महाविद्यालय राहुरी येथे विद्यापीठात स्थलांतरितनगर जिल्ह्याचे शासकीय कृषी महाविद्यालय जामखेड तालुक्यात सुरू केले होते. तेथेही महाविद्यालयाची इमारत व इतर सुविधांचे मुद्दे उपस्थित झाले. यामुळे कृषी विद्यापीठाने जामखेडचे महाविद्यालय राहुरी येथे विद्यापीठाच्या आवारात स्थलांतरित केले. असाच निर्णय मुक्ताईनगरच्या महाविद्यालयाबाबत घेण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत, असे कळते. स्थानिक अध्यापक अत्यल्पमुक्ताईनगर येथे कार्यरत शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 101 पदे मंजूर करायची आहेत. पण अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सहयोगी प्राध्यापकांसह (अध्यापक) इतर पदांवर प्रभारी आहेत. जिल्ह्यातील किंवा स्थानिक शिक्षक फारसे नाहीत. काही प्रभारी शिक्षकांनी हे महाविद्यालय तेलबिया संशोधन केंद्रात हलविण्यासंबंधी विद्यापीठाकडे मागणी केली आहे.
कृषी महाविद्यालयाचे तात्पुरत्या स्वरुपात जळगावात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:28 AM