जळगाव : चालत्या खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मृत व जखमी प्रवाशांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जळगाव न्यायालयाने दिला आहे. मृताच्या पत्नीला १३ लाख ४२ हजार तर ३३ टक्के जळालेल्या महिलेला ४ लाख २४ हजार रुपये देण्याचे आदेश झाले आहेत.पारोळा येथील भारती गोकुळ हिंदूजा (४०), पती गोकुळ हिंदूजा (४५) व मुलगा शिवम (५) असे २९ मे २०१४ रोजी बाबा ट्रॅव्हल्स बसने पारोळा ते नागपूर प्रवासासाठी निघाले असता अमरावतीजवळ या बसला अचानक आग लागली. त्यात ५ जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले होते. त्यातील जखमींना नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या गोकुळ सिताराम हिंदूजा यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे १७ जुलै २०१४ रोजी गोकुळ हिंदूजा यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी तळेगाव, जि.वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पत्नी भारती यांनी नुकसान भरपाईसाठी अॅड. महेंद्र सोमा चौधरी (रा.जळगाव) यांच्यामार्फत जळगाव न्यायालयात दावा दाखल केला होता.न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन मोटार वाहन अपघात प्राधिकरणाचे सदस्य आर.एन.हिवसे यांनी भारती यांना १३ लाख ४२ हजार तर स्वत: जखमी झालेल्या भारती हिंदूजा यांना ४ लाख २४ हजार रुपये व मुलगा शिवम याला ४० हजार ५०० रुपये भरपाइचे आदेश दिले.
ट्रॅव्हल्सचे आग प्रकरण, मृताच्या पत्नीला १३ लाख ४२ हजार रुपये देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:46 PM