लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडनंतर काही रुग्णांना म्यूकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीजन्य आजाराची लागण होत आहे. याच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आजाराच्या उपचार व निदानासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून त्याची बैठक घेऊन विविध पातळ्यांवर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी उपायायोजना केल्या आहेत. या रुग्णांनावर सर्व उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच होणार असल्याची माहिती डॉ. रामानंद यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्यूकरमायकोसिसचे ११ संशियत रुग्ण असून काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या आजाराचे निदान तातडीने करण्यासाठी त्याची उपचारपद्धती ठरविण्यासाठी, उपचार तातडीेन मिळावे याचे नियेाजन करण्यासाठी अधिष्ठातांनी प्रमुख डॉक्टरांची कृती समिती स्थापन केली आहे. याची महत्त्वाची बैठक जीएमसीत पार पडली.
यांचा समितीत समावेश
अध्यक्ष अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्यासह समितीत औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले, सुक्ष्मजीव शास्त्र विभागप्रमुख डॉ.किशोर इंगोले, बालरोग विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.विजय गायकवाड, कान, नाक घसा तज्ञ डॉ. हितेंद्र राऊत उपधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. इम्रान तेली यांचा समावेश आहे.
अशा आहेत उपाययोजना
म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष राहणार, ज्या ठिकाणी व्हेंटीलेटरची सुविधा असेल औषधोपचारांसह ज्या काही प्रमुख शस्त्रक्रिया आहेत त्याही जीएमसीत होणार आहे. रुग्णांचे निदान करण्यासाठी सुक्ष्मजीव शास्त्र, कान नाक घसातज्ञ, नेत्रतज्ञ यांची प्रमुख भूमिका राहणार आहे. पॅथॉलॉजीची यात मदत घेण्यात येणार आहे.
इंजेक्शन सोमवारपर्यंत येणार
म्यूकरमायकोसिस या बुरजीशजन्य आजारावर आवश्यक असलेली औषधीं, इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली असून येत्या सोमवारी ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. साधारण ३०० इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. बाहेर अत्यंत महागडी असणारी हे इंजेक्शन जीएमसीत रुग्णांना डॉक्टरांनी ठरविलेल्या निकषानुसार मोफत दिले जाणार आहे.