जळगाव : वाऱ्यामुळे बळीराम पेठेतील केळकर मार्केट समोर शनिवारी मध्यरात्री महावितरणच्या रोहित्रावर मोठे झाड कोसळले. यामुळे केळकर मार्केटकडून जिल्हा परिषदेकडे येणारा रस्ता रविवारी दिवसभर बंद होता.
महावितरणचे सहाय्यक अभियंता रोहित गावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळकर मार्केटमध्ये जुन्या जिल्हा परिषद इमारतीच्या पाठीमागे महावितरणचे राेहित्र बसविण्यात आले आहे. शनिवारी रात्री वाऱ्यामुळे या रोहित्राच्या काही अंतरावर असलेले झाड वाऱ्यामुळे कोसळले. मात्र, यात रोहित्राचे कुठलेही नुकसान झाले नाही. विद्युत तारा मात्र तुटून पडल्या असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळतात रोहित गावे यांनी घटना स्थळी धाव घेतली. झाड कोसळल्यामुळे केळकर मार्केट व फुले मार्केटातील विज पुरवठा खंडित झाला होता. या नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला करून व तुटलेल्या विद्युत तारा जोडून सायंकाळी येथील विज पुरवठा सुरळीत केला.