भुसावळ : येथील गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना नियमाचे पालन व्हावे व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून विविध ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे संकलन करण्यात आले. ‘गणरायाची मूर्ती द्या व फळाचे वृक्षरोप भेट घ्या’ हा उपक्रम मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता गौरव अहिरे, लोकेश ढाके यांच्या सहकार्याने श्री रिदम हॉस्पिटल, हार्ट, ट्रामा आणि डायलिसिस सेंटर व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, रघुनाथ सोनवणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे. यात ज्या भाविकांनी म्युनिसिपल हायस्कूल जामनेर रोड या ठिकाणी गणरायाची मूर्ती विसर्जनासाठी जमा केली, त्या कुटुंबाला एक फळाचे झाड भेट देण्यात आले आणि त्या झाडाचे वर्षभर संगोपन आणि संवर्धन करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचा पुढील वर्षी गणेशाच्या आगमनाच्या वेळी सत्कार करण्याचे नियोजन राहील. यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी आणि घरगुती गणेश बसविणाऱ्या भक्तांनी आपल्या मूर्ती याठिकाणी देऊन उपक्रमास प्रतिसाद दिला.
कदाचित राज्यातील एकमेव उपक्रम -वाघचौरे
कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमाच्या चौकटीत तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता मूर्ती संकलन केंद्रावर विसर्जन करा व वृक्ष भेट घ्या, हा उपक्रम राज्यात एकमेव असावा. प्रत्येक मूर्ती देणाऱ्यास फळाचे वृक्ष भेट म्हणून देण्यात आले, नक्कीच कौतुकास्पद उपक्रम आहे. अशाच पद्धतीने समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी रघुनाथ सोनवणे, ज्ञानेश्वर घुले, डॉ. गणेश पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. महेश पांगळे, डॉ. कुशल पाटील व श्री रिदम मेडिकलचे संचालक गौतम चोरडिया, समता फाउंडेशनचे राम लंके व भालेराव उपस्थित होते.