चुडामण बोरसे/जळगाव - सरकारी अधिकाऱ्याने ठरविले तर ते चांगले काम करुन दाखवू शकतात. गोंडगाव (ता. भडगाव) येथील तत्कालीन शाखा अभियंता डी.टी. पाटील यांनी अतिशय अल्पखर्चात सुमारे १२०० झाडे लावून ती जगविली आहेत. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे .... या अभंगांचा प्रत्यय या परिसरात गेल्यावर होतो. जामदा उजवा कालवा, शाखा गोंडगाव कॉलनी येथे पाटील यांनी तीन वर्षापूर्वी जवळपास १२०० झाडे लावली. ती आज ४० ते ५० फुटापर्यंत वाढली आहेत. यामुळे गोंडगाव शाखेचा परिसर हिरवागार झाल्याचे दिसत आहे. या कामासाठी तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर होता. त्यापैकी फक्त ९० हजार रुपयात हे अवघड काम आपण करुन दाखविल्याचा त्यांचा दावा आहे.
या १२०० झाडांमध्ये ३५० चिंचेची झाडे, ५० बांबूची झाडे, ३५० गुलमोहर झाडे तर इतर जातीची तब्बल ४५० झाडे इथे आहेत. एवढेच नाही तर इलेक्ट्रीक मोटार, जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून स्वखर्चाने कंपाऊडही तयार केले आहे. विशेष म्हणजे या परिसरात पीर बाबांचा दर्गा आणि जवळच जर्नादन स्वामींचा आश्रम आहे. त्यात या बहरलेल्या वृक्षराजीमुळे या परिसराला वेगळी शोभा आली आहे.वाहून जाणारे पाणी अडविले
याशिवाय पावसाळ्यात वाहून जाणा-या गिरणेच्या पाण्याचा पुनर्भरणासाठी उपयोग करण्याचा एक प्रयत्न पाटील यांनी केला. त्याला यशही मिळाले. गिरणा प्रकल्पावरील जामदा कालव्यावर वितरिका व औटलेट गेट नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये उजव्या कालव्यावरील गिरणा नदीचे वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी नदीनाले, विहिरी भरण्यासाठी टाकता येत नव्हते. अभियंता पाटील यांनी उजव्या कालव्यावरील सर्व चा-यांना गेट बसविले. त्यामुळे पावसाळ्यात गिरणेचे पाणी नदीनाले व विहिरीच्या पुनर्भरणासाठी देता आले.त्याचा फायदा अनेक गावांना झाला आहे.
एवढेच नाही तर उजव्या कालव्यावरील शेवटच्या चारीचा काही भाग सिंचनासाठी एक वर्षापासून बंद होता. तो त्यांनी मागील वर्षी सिंचनासाठी खुला करुन दिला. याचा फायदा वाडे (ता. भडगाव) या गावाला झाला. कारण वाडे गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी विहिरींनी तळ गाठला होता. त्या वर्षी पावसाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे दिल्याने विहिरींचे पुनर्भरण झाल्याचा पाटील यांचा दावा आहे.नेहरुजी - इंदिराजी यांची परिसराला भेटमहाराष्ट्रात सन १९५२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधीही होत्या. नेहरु व इंदिराजी गोंडगाव पाटशाखेच्या विश्रांतीगृहात काही काळ थांबले होते, त्यांना आदरांजली आणि अभिवादन म्हणून आपण ही वृक्षराजी इथे लावली आणि त्याचे जतनही केले आहे. गोंडगाव पाटशाखेचा हा परिसर आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.