बोदवड : पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासींनी शुक्रवारी दुपारी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.याबाबतची माहिती अशी की, २१ रोजी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील मलकापूर रस्त्यावरील मद्य विक्रीच्या दुकानात दीपक अशोक इंगळेसह अन्य आठ ते १० साथीदारांसोबत भिल्ल वाड्यातील रवींद्र सुभाष ठाकरे (वय २२) या तरुणाचे पैसे हिसकण्याच्या वाद झाला होता. याप्रकरणी आरोपी रवींद्र ठाकरे याला पोलिसांनी त्याच रात्री ताब्यात घेतले होते. रात्री बाराच्या सुमारास त्याला सोडून दिल्याचे पोलीस सुत्रानुसार माहिती आहे. परंतु रवींद्र हा मंगळवार, २१ रोजीपासून घरी परतलाच नाही. त्याला ताब्यात घेणारे उपनिरीक्षक सिद्धार्थ खरे व पोलीस कर्मचारी शिवाय तक्रारदार दीपक इंगळे व साथीदारांनी त्याला जबर मारहाण केली असून त्याचा घातपात केल्याचा आरोप त्याची आई सयाबाई सुभाष ठाकरे व आदिवासी समाज एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली शिवाय आमचा मुलगा आम्हाला परत द्या या घोषणेसह आदिवासी समाजबांधवांनी बोदवड पोलीस ठाण्यावर दुपारी १२.३० वाजता मोर्चा काढून प्रचंड रोष व्यक्त केला.भिल्ल समाज बांधवांना शांततेचे आवाहन करीत पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनकर यांनी बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी रावेरकडे पथक रवाना केले. तरुण गत चार दिवस उलटून ही घरी न परतल्यामुळे कुटुंबिय व आदिवासी समाजबांधवांनी त्याचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचे बरेवाईट केल्याचा संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस ठाण्यासमोर उपोषण मांडण्याचा इशारा ही दिला आहे. (वार्ताहर)
पोलिसांच्या ताब्यातील तरुण बेपत्ता झाल्याने आदिवासींचा मोर्चा
By admin | Published: March 24, 2017 6:28 PM