जळगाव : ड्रायव्हिंग स्कूल चालवायची असेल तर रस्त्याला लागूनच दोन एकर जागा, त्यावर सिग्नल यंत्रणा, रस्ते यासह इतर आवश्यक भौतीक सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यासाठी अधिसूचना प्रसिध्द केली आहे, त्यावर २८ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविलेल्या आहेत. केंद्र सरकार सध्याच्या ड्रायव्हिंग स्कूल मोडीत काढत असून त्या भांडवलादारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सध्याच्या ड्रायव्हिंग स्कूल बंद पडू शकतात व सर्वसामान्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे आवाक्याच्या बाहेर जाईल, त्यामुळे अशा व्यक्ती वाहन चालविण्याचा परवानाच घेऊ शकणार नाही. शहरात दोन एकर जागा रस्त्याच्या लागूनच घ्यावयाची असेल तर त्यासाठी किमान दोन कोटी रुपये व या जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारायच्या सुविधांचा खर्च ५० लाखाच्या घरात जावू शकतो, याचा अर्थ एका ड्रायव्हिंग स्कूल चालकाला अडीच कोटीचा खर्च येत असेल तर त्या तुलनेत प्रशिक्षण घेणाऱ्या उमदेवाराला शुल्क किमान २५ हजाराच्या जवळपास जावू शकते. सध्याच्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात ७० तर राज्यात १८ हजार ड्रायव्हींग स्कूल असून यापैकी एकही जण केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करु शकत नाही. पुण्यात नुकतीच महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनची बैठक झाली. त्यात सर्वानुमते केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्यात आला.
परिवहन विभागाने जागा घ्यावी
परिवहन विभागाला देखील जागेची आवश्यकता असते. मध्यंतरी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी राज्यात ५० ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते. त्यासोबतच ड्रायव्हिंग स्कूल चालविण्यासंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली होती. परिवहन विभागाने दोन एकर जागा घ्यावी व त्याचा वापर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनाही करु द्यावा, त्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारावे अशी मागणी असोसिएशनकडून होत आहे.
कोट...
केंद्र सरकारने काढलेली अधिसूचना पाहता ड्रायव्हिंग स्कूल कार्पोरेट क्षेत्राकडे देण्याचा कल दिसतो. त्यामुळे सध्याच्या ड्रायव्हिंग स्कूल चालकांसह सर्वसामान्य व्यक्तीला प्रशिक्षण हे खूप खर्चिक होणार आहे. महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने या निर्णयाला एकमुखी विरोध दर्शविला आहे. सामान्य नागरिकांनी देखील हरकती घेऊन विरोध नोंदवावा.
-जमील देशपांडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन