जळगाव : महावितरण कंपनीच्या कोविड क्वारंटाइन सेंटरमधील गादी, पलंग, लाइट व पंखे लांबविणाऱ्या संतोष ऊर्फ बाळू नामदेव सैदाणे (४५, रा.सदगुरूनगर), दत्तू नामदेव चौधरी (वय ३७, रा.जैनाबाद) व सुरेश ऊर्फ सागर प्रमोद सोनवणे (वय ३५, रा.खेडी) या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महावितरण कंपनीच्या परिमंडळ कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कर्मचारी निवासस्थानामधील खोली क्र.३ व ४ मध्ये कोविड क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आले होते. हे कोविड सेंटर बंद झाल्यानंतर तेथे चार महिला कर्मचारी प्रशिक्षणासाठी थांबल्या होत्या. प्रशिक्षण संपल्यानंतर या महिला २७ जुलै रोजी खोल्यांना कुलूप लावून निघून गेल्या. ३ ऑगस्ट रोजी या खोल्यांमधील पंखे, गाद्या, लाइट व इतर साहित्य असा ६५ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या कोविड सेंटरमधील साहित्य तिघांनी लांबविल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती, त्यानुसार सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी व इम्तियाज खान यांनी शनिवारी तिघांचा शोध घेऊन सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.