याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोरा येथील मुकेश सुभाष अग्रवाल यांनी खरेदी केलेला ३८५ कट्ट्यातील २२ टन मका म्हणजेच ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा माल गोदरेज सिडस जेनेटिक्स ली ओझर यांना पोहोच करण्यासाठी ट्रक (एम. एच. १८, बीजी ६३५१) ने वाहतूक करण्यासाठी पूजा रोडलाईन्सचे मालक मनोज पाटील यांच्याशी ठरविण्यात आला होता. मालाची बिलटी घेत ट्रकचालक गणेश यादव (करणगाव, ता. निफाड) याच्या ताब्यात हा माल मोजून देण्यात आला. हा माल विशिष्ट वेळेत संबंधित व्यापाऱ्याकडे ओझर येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, गाडीही आली नाही व मालसुद्धा पोहोचला नाही म्हणत गोदरेज सिडसच्या व्यापाऱ्याशी संपर्क झाल्यानंतर अग्रवाल यांनी ट्रक मालक गोकुळ गिरे (करणगाव, ता. निफाड) यांच्याशी संपर्क केला असता मालकानेही उडवाउडवीची उत्तर दिले.
ट्रक मालकाने तपास केला असता चालक, क्लिनर ट्रक निफाड येथे चौकात उभा करून फरार झाल्याचे समजले. त्यावेळी अग्रवाल यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाचोरा पोलिसांत ट्रक चालक, मालक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.