चाळीसगाव-रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात ठोस मारल्याने मोटारसायकल वरील करगाव तांडा नंबर दोन मधील दोघे पिता -पुत्र जागीच ठार झाले आहे. ही घटना २४ रोजी रात्री दहा वाजता चाळीसगाव-धुळे रोडवरील भोरस फाट्याजवळ घडली आहे.या घटनेने करगावतांडा येथे शोककळा पसरली आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या अपघातात करगाव तांडा नंबर दोन येथील शेतकरी समिष राठोड (५७) व मुलगा राकेश सतीश राठोड या दोघांचा मृत्यू झाला आहे.भोरस शिवारात सत्यम जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या शेतजमिनीत रात्रीची लाईट असल्याने पिकाना पाणी भरण्यासाठी शेतकरी सतीश राठोड व मुलगा राकेश राठोड हे दोघेही मोटारसायकलने जात होते.भोरस फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात धडक मारली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांना जबर मर लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघाताची माहिती खबर न देता पळून गेला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सांगितल्यावरुन हा ट्रक (एमएच ०५ के ९६८१) असा असून त्या ट्रकचालकाविरुध्द गोकुळ राठोड यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे करीत आहे. दरम्यान, या ट्रकचालकाची माहिती संबंधित विभागाकडून तपास कार्य सुरू केले असून लवकरच आरोपीस अटक करू, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे यांनी सांगितले. दोघांवर दसऱ्याच्या दिवशी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे करगावात दसरा सण साजरा झाला नाही.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वरील धुळे रोडवरील भोरस फाटा हा मृत्युचा सापळा ठरत आहे. या फाट्याजवळ अनेक छोटे-मोठे अपघात होत आहे. फाट्याच्या आजूबाजूला स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने वेगाने जात असल्याने अपघात होत असतात.संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.