जळगाव - महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुदैवाने एक मोठा रेल्वे अपघात टळला. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खडी वाहून नेणारा ट्रक भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेनला धडकला. या धडकेमुळे रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. (A truck laden with stones hit the railway, fortunately a major accident was averted in Jalgaon) याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील भोणे गावाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरू होते. येथे बांधकामासाठी लागणाऱ्या खडीने भरलेला डंपर ट्रॅकच्या बाजूला होता. कामगारांच्या बेफिकीरीमुळे अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस जळगाव कडे जात असताना खडीने भरलेला ट्रक घसरून रेल्वेवर जाऊन धडकला. सुदैवाने या अपघातात जीवित आणि वित्तहानी झाली नाही. मात्र काही वेळ गाडी थांबवण्यात आली.
जेसीबीने डंपर खाली करून ट्रक मागे सरकवण्यात आला व काही वेळानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र ठेकेदार अथवा कामगारांच्या बेफिकीरीने मोठा अपघात होऊन अनर्थ घडू शकला असता.