मिलिंद कुलकर्णीखान्देशातील २० जागांसाठी तब्बल २२६ उमेदवारांनी मुलाखती दिल्याने भाजपचा उत्साह आणि आत्मविश्वास दुणावला आहे. सक्षम, तुल्यबळ आणि वजनदार उमेदवार मुलाखतीसाठी आल्याने भाजपची इच्छा स्वबळावर निवडणूक लढण्याची असली तर त्यात वावगे काही म्हणता येणार नाही. खरी कसोटी ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडीची आहे. भाजपसारख्या मोठ्या भावांकडून ‘वाटा’ मिळविताना सेनेची दमछाक होणार आहे. काँग्रेस आघाडीला तुल्यबळ उमेदवार शोधण्याची वेळ अनेक मतदारसंघात आली आहे. त्यातून ते कसे मार्ग काढतात, यावर समीकरण अवलंबून राहील.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेश विसर्जनंतर केव्हाही लागू शकते. काहींच्या मते १३ रोजी तर काहींच्या मते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा संपल्यावर म्हणजे १९ नंतर लागू शकते. याचा अर्थ दहा दिवसात कधीही निवडणूक घोषित होऊ शकते. प्रशासकीय तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने गेल्याच आठवड्यात घेतला असल्याने बिगूल वाजला आहेच.भाजपने खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील मुलाखती आटोपल्या आहेत. राज्यमंत्री मदन येरावार आणि मिलिंद पाटील या निरीक्षकांनी मुलाखती घेतल्या. ‘इनकमिंग’ वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन मुलाखतीच्यावेळी कुणालाही रोखले गेले नाही. प्रत्येक उमेदवाराला किमान १० मिनिटे वेळ देण्यात आला. प्रत्येक उमेदवाराशी बोलून त्याचा दृष्टीकोन, निवडून येण्याची क्षमता, निवडणुकीसाठी त्याच्याकडील संसाधने (रिसोर्सेस), कार्य आदींची माहिती घेतली गेली. या मुलाखतीचा अहवाल आणि सर्वेक्षणाचा अहवाल एकत्रित करुन प्रदेश समिती तीन उमेदवारांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविणार आहे, असे मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांना अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत आशा ठेवायला हरकत नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्याकडे भाजपचा प्रयत्न राहणार आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या मतदारसंघात कोणीही उमेदवारी मागितलेली नाही, यावरुन पक्षावरील त्यांची पकड दिसून येते. याउलट एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात ८, डॉ.विजयकुमार गावीत यांच्या नंदुरबारात ४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.वारसदारांना संधी देण्याचा प्रयत्न नेत्यांचा दिसून येत आहे. चाळीसगावात खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, माजी मंत्री डॉ.शालिनी बोरसे यांच्या कन्या डॉ.माधुरी बाफना, मनोहर भदाणे यांचे पूत्र राम भदाणे, माजी मंत्री गो.शि.चौधरी यांच्या कन्या विद्या बागूल, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत, आमदार उदेसिंग पाडवी यांचे पूत्र राजेश पाडवी, कुवरसिंग वळवी यांचे पूत्र विशाल वळवी, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी मुलाखती दिलेल्या असून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.नंदुरबारच्या जिल्हाध्यक्ष खासदार डॉ.हीना गावीत यांचे पिता व भगिनी, धुळ्याचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जळगावचे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.एरंडोल आणि धुळे शहर हे मतदारसंघ २००९ च्या युतीच्या समीकरणानुसार सेनेकडे होते. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर हे मतदारसंघ भाजपने जिंकले. चिमणराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यासाठी सेनेला ही जागा हवी आहे, मात्र भाजपकडे एकाहून अधिक तुल्यबळ उमेदवार असल्याने या जागेवरुन पेच निर्माण होऊ शकतो. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांना हेरण्याचे प्रयत्न आता काँग्रेस आघाडीकडून सुरु आहेत. कारण ही मंडळी मूळची काँगे्रेसजन आहे, असे समर्थन केले जाऊ शकते.
सेना, काँग्रेस, राष्टÑवादीची खरी कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:35 PM