प्रापंचिक जीवनातील संसार रथाला कितीही चाक असली तरी देवधर्माचं एक चाकही असणं महत्वाचं आहे. कारण हवा निघून गेलेल्या चाकाच्या ठिकाणी हे एक वेगळं चाक ऐनवेळी कामात पडत. संकटकाळी सर्व उपाय निरुपयोगी ठरतात, त्यावेळी माणूस आपोआप अध्यात्माकडे वळतो. हे समीकरण नुसतं वाचून चालणार नाही तर आचरणात आणनेही महत्वाचे आहे.कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरणाचा प्रसंग म्हणजे त्या सभेतील प्रत्येक शूरवीरांची परीक्षाच होती. धुतराष्ट् हे अंध होते पण विचाराने नव्हे, परंतु पुत्रप्रेमाच्या स्वप्नातून ते सत्य सृष्टीत आले नाही. भीष्म पितामह द्रौपदीचे फार मोठे आशास्थान, मात्र या प्रसंगात ते आपल्या दुर्बल मनाला कुरवाळत बसले. भुजामध्ये शक्ती, बळ असूनही कच्च्या मनापुढे त्यांना हार स्वीकारावी लागली. त्यांचे जीवन हे त्यागमय होते. मात्र यावेळी त्यांच्याही त्यागाला स्वार्थ आडवा आला. गुरू द्रोणाचार्याचं आचार्यपदही कळसूत्री ठरलं. ज्या सभेत वृद्ध नाही ती सभा नाही, धर्माच्या गोष्टी सांभाळत नाहीत ते वृद्ध नाही, ज्यात असत्य आहे तो धर्म नाही, ज्यात छल कपट आहे ते सत्य नाही, दुर्योधनाच्या सभेत सत्य होत, मात्र ते छल कपटांनी भरलं होत. सत्याच्या रक्षणासाठी सत्यच उपयोगाला येतं. द्रौपदीला शेवटी न्याय मिळाला तो तिच्यातल्या सत्य धमार्मुळे. ‘धर्मो रक्षती रक्षित:’ माणसाचे सर्व आधार कमजोर ठरले की तो देवाकडे येतो. धर्म संस्थापक श्रीकृष्णाकडे तिने अब्रू रक्षणासाठी भगवंताकडे याचना केली. श्रीकृष्णा.... या जगात तुझी भक्त-भगिनी एकटी पडली आहे, तुझ्याशिवाय आता मला कोणताच आधार, आश्रय नाही, तू माझा बंधू आहेस ना ? माझ्या लज्जारक्षणाचा राखणदारही तूच आहेस, भगवंता, पुरुषोत्तमा तू भक्तांना सर्व काही देऊ शकतोस, माझी या घडीला लाज राख, पदर पसरून मी तुला आज दान मागते तू तर कृपेचा दयेचा सागर आहेस, त्या कृपेच्या सागरातील एक थेंब तरी माज्या वाट्याला येऊ दे. तू असतांना हे असं घडत आहे. भक्ताचं रक्षण करणं तुझं ब्रीद आहे. त्याची मी तुला आठवण करून देत आहे.तिच्या रोमारोमातून कृष्णाचा महाजप सुरू होता. भगवंताच्या ब्रिदाची त्याला पुन्हां पुन्हा आठवण करून देतांना डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूपुरांनी ती न्हाऊन निघत होती. भगवंतांनी द्रौपदीला त्यावेळी जी वस्त्रे पुरवली, त्यातील प्रत्येक धाग्यांनी तिची लाज राखली. सभेतील सर्वांनी तोंड फिरवून खाली माना घातल्या, मात्र धर्म कधीही तोंड फिरवत नाही व खालीही पाहत नाही.- वासुदेव चव्हाण, शहापूर ता.जामनेर.
सत्य रक्षणासाठी सत्यच उपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 8:07 PM